Friday, February 24, 2023

वृत्त क्रमांक 89

 शेती, शेतकरी आणि भक्तीचा मार्ग

रस्ते विकासातून होण्यासाठी कटिबद्ध
- केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
· जिल्ह्यातील विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात
गडकरी यांची जिल्ह्यास विविध महामार्गांची अपूर्व भेट
· अवघ्या साडेतीन तासात नांदेडहून गाठता येईल पुणे
नांदेड, (जिमाका) दि. 24 :-अती श्रीमंत देशच विविध महामार्गांची बांधणी करू शकतात हे सत्य नसून चांगल्या रस्त्याच्या बांधणीतून देशाला समृद्धीचा मार्ग गाठता येतो. या देशातील शेती, शेतकरी यांना खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रवाहात जर आणायचे असेल तर शेतीसाठी भक्कम रस्ते, भक्कम रस्त्यांच्या माध्यमातून कृषिपुरक उद्योगाला चालना आणि उद्योगासाठी आवश्यक ठरणाऱ्या वाहतुकीच्या ऊर्जेसाठी जैवइंधन-बायोडिजेल, इथेनॉल, ग्रीन हॉड्रोजन, बायो सीनएजी यावर भर हा भविष्यातील समृद्धीचा मार्ग आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नजरेतील समृद्ध भारताचा हाच मंत्र असून या कामांसाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
गुरूद्वारा बोर्ड मैदान येथे जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार भिमराव केराम, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, माजी आमदार सुभाष साबणे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, प्रणितीताई देवरे, व्यंकटेश गोजेगावकर, प्रविण साले आदी मान्यवर उपस्थित होते.
नांदेड शहराला ऐतिहासिक वारसा आहे. येथील भूमी गुरूगोविंदसिंघजी यांच्या वास्तव्याने पुणित झालेली आहे. भारतातील सर्व धर्माच्या अध्यात्मिक क्षेत्राला राष्ट्रीय महामार्गांच्या चांगल्या सुविधेने जोडण्यासाठी आम्ही विश्वास बसणार नाही असे प्रकल्प पूर्ण करून दाखविले. बुद्धा कॉरीडॉन, लडाख, अरुणाचल, हिमाचल, बिहार, उत्तराखंडपासून थेट दक्षिणेपर्यंत रस्त्याचे भक्कम जाळे आता निर्माण झाले आहेत. यातील काही सेक्शनचे काम येत्या 2024 पर्यंत आम्ही युद्धपातळीवर पूर्ण करू असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
तीन शक्तिपीठांना जोडणारा मार्ग पूर्णत्वास
महाराष्ट्रातील अध्यात्मिक मार्ग समृद्ध व्हावा यावरही आम्ही भर दिला. यातूनच पंढरपूर-देहू-आळंदी हा महामार्ग आता पूर्णत्वास आला आहे. महाराष्ट्रातील तीन शक्तीपिठांना जोडणारा महामार्गही पूर्ण होत आला आहे. रत्नागिरी ते नागपूर या सुमारे 30 हजार कोटी खर्चाच्या महामार्गात महाराष्ट्रातील कोल्हापूरची अंबाबाई-तुळजापूर येथील आईभवानी आणि माहूर येथील रेणुकामाता ही तीन शक्तीपिठे जोडली जात आहेत. यातील वारंगाफाटा ते पुढील काम, लातूर ते नांदेड मार्गातील अडचणी दूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
माहूरगडावर वृद्धांना विनासायास जाता यावे यासाठी स्कायवॉक
माहूर हे आमची कुलदैवत आहे. येथील गडावर वृद्ध ज्येष्ठांना विनासायास जाता यावे यासाठी माझ्या बहिणीची इच्छा होती. अनेक ज्येष्ठांना गडाच्या पायऱ्या चढताना थांबावे लागते. भक्तांना कष्ट होतात. भारतातील इतर देवस्थानांच्या विकासाप्रमाणे माहूरगडावरही लवकरच स्कायवॉक, चारमजली लिफ्टसह दोन स्टेशन, पायऱ्यांवर असलेल्या व्यापाऱ्यांसाठी चांगले मार्केट, नास्ता-प्रसादाची वेगळी सुविधा, गडाच्या पायथ्याशी पार्किंग असा एक चांगला प्लॅन तयार केला आहे. अर्थात राज्य शासनाशी चर्चा करून याला निश्चितच लवकर आकार देऊ अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
नांदेड जिल्ह्यात गत 8 वर्षात 508 कि.मी. लांबीचे राष्ट्रीय महामार्ग
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सन 2014 पर्यंत जिल्ह्यात 258 कि.मी. लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते. सन 2014 नंतर आजपर्यंत जिल्ह्यात 766 कि.मी. रस्त्याची सुविधा निर्माण केली आहे. सुमारे 508 कि.मी.ची यात भर पडली आहे. येत्या 6 महिन्यात जिल्ह्यात ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत ती पुर्णत्वास येतील असे सांगून त्यांनी सुमारे 1 हजार कोटी रुपयांच्या 7 कामांची घोषणा करून नांदेड जिल्ह्याला नवी भेट दिली.
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड शहरातील वाहतुकीची कोंडी सुटावी यासाठी उड्डाणपुलांची मागणी केली. याचबरोबर तेलंगणा, आंध्र आणि कर्नाटकच्या सिमेवर असलेल्या देगलूर, मुखेड, उदगीर आणि किनवट भागातील रस्त्यांच्या कामांची मागणी केली. खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार यांनी विविध मार्गांच्या केलेल्या मागणीचा आंर्तभाव येत्या विकास कामात घेतल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगीतले.
000000












No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...