Wednesday, August 24, 2022

 वृत्त क्र. 2365

 

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉ. भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे

यांच्या शतकपूर्तीनिमित्त विधानसभेत गौरव

डॉ.केशवराव धोंडगे यांच्याकडून कष्टकरी, कामगारांसाठी आयुष्य समर्पित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबई, दि. 24 : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. केशवराव धोंडगे यांनी कष्टकरी, कामगार व दिनदुबळ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आयुष्य समर्पित केले, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांचा गौरव केला. डॉ.केशवराव धोंडगे यांना दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

            ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व माजी आमदार डॉ. भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांच्या संसदीय व सामाजिक कार्याचा गौरव आज विधानसभेत करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विरोधी पक्ष नेते अजित पवार सर्वश्री सदस्य बाळासाहेब थोरात, भास्करराव जाधव, श्यामसुंदर शिंदे, हरिभाऊ बागडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, केशवरावजी शंकरराव धोंडगे यांचा जन्म २५ जुलै १९२२ रोजी मन्याड व पार्वती नदीच्या खोऱ्यात वसलेल्या गऊळ गावी झाला. त्यांचे शिक्षण बी. ए. पर्यंत झाले. त्यांनी १९४८ मध्ये श्री. शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून ज्ञानदानाचे कार्य केले. औरंगाबाद, नांदेड, कंधार मधील वाडी तांड्यावरच्या मुलामुलींना शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करुन दिली. १२ प्राथमिक शाळा, ११ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, दोन वरिष्ठ महाविद्यालये व एक विधी महाविद्यालय सुरु केले. हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रीय सहभाग घेतला. आणीबाणीच्या काळात कारावासही भोगला.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, जनतेच्या न्याय हक्कासाठी श्री. धोंडगे यांनी अनेक आंदोलने केली. त्यांनी 'वंदे मातरम्' गीताने दोन्ही सभागृहांच्या सत्राचा प्रारंभ व्हावा, अशी आग्रही मागणी केली होती. त्यानुसार डिसेंबर, १९९० पासून दोन्ही सभागृहांच्या सत्रांचा प्रारंभ 'वंदे मातरम्' गीताने होऊ लागला आहे. मराठवाडा विकासासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करणे, लोहा तालुक्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरीत आरक्षण असावे यासाठीही विशेष प्रयत्न केले.

            नांदेड जिल्ह्यात एसटी डेपोची मागणी, विधानसभेच्या मध्यवर्ती सभागृहात महात्मा फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्य शासनाच्यावतीने प्रकाशित करणे अशा अनेक मागण्या त्यांनी शासन दरबारी मंजूर करुन घेतल्या. विविध संसदीय आयुधाचा वापर करून समाजपयोगी कामे कशी तडीस न्यावीत हे श्री. धोंडगे यांनी दाखवून दिले आहे. श्री. धोंडगे जसे राजकारणी व समाजकारणी आहेत तसे ते पत्रकार व साहित्यिकही आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, लोहा तालुक्याच्या सीमेवर त्यांनी गुराखीगडाची निर्मिती केली. सन १९९१ पासून येथे दरवर्षी जागतिक गुराखी साहित्य संमेलन भरविले जाते. श्री. धोंडगे यांनी विपुल लेखन केले आहे. 'जय क्रांती या साप्ताहिकाचे ते संपादक राहिले आहेत. त्यांनी आजतागायत सुमारे ३० पुस्तकाचे लेखन केले आहे.

            'दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ संपादक पुरस्कार', 'धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार', 'मराठवाडा रत्न पुरस्कार', 'भारतीय विकास रत्न अॅवॉर्ड' अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 'श्री शिवाजी लोक विद्यापीठ, कल्याण यांनी त्यांना मानद डि. लीट. पदवी प्रदान करुन सन्मानित केले आहे, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यावेळी म्हणाले.

०००००

वृत्त क्र. 2370

शेतकऱ्यांचे कल्याण आणि विकासामध्ये

डॉ. भाई केशवरावजी धोंडगे यांचे योगदान मोठे

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई,  दि. 24 : मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार हीच जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या डॅा. भाई केशवरावजी धोंडगे यांनी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी काम केले आहे. दांडगा जनसंपर्क असलेले लोकप्रतिनिधी, साहित्याचे जाणकार, अभ्यासू लेखक आणि व्यासंगी पत्रकार असलेल्या धोंडगे यांचे कार्य, योगदान मोलाचे असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत काढले.

            ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. भाई केशवराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांच्या संसदीय कार्याचा गौरव करण्याचा प्रस्ताव उपसभापती डॅा. नीलम गो-हे यांनी मांडला. हा प्रस्ताव सभागृहाने एकमताने संमत केला. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. 

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सभागृहात भाई बोलायला लागले की विरोधी पक्षानेही कान टवकारून ऐकावे असे त्यांचे सभागृहातील निवेदन असे. जातीपातीच्या जोखडातून समाज मुक्त व्हावा यासाठी ते प्रयत्नशील होते आणि आहेत. अंधश्रद्धा आणि त्यामुळे येणारी सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक गुलामगिरी यातून भोळ्याभाबडया समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी समाजजागृतीचे कार्य केले. छत्रपतींचा राष्ट्राभिमान, मुत्सद्दीपणा, लोकसंग्रह, महात्मा गांधींची निःस्वार्थ, निरपेक्ष सेवावृत्ती, लोकमान्यांचा कर्मयोग आणि कर्मयोगावर आधारलेली समाजरचना घडवण्यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला.  उपेक्षित समाजाला जगण्याचा हक्क त्यांनी मिळवून दिला. 

            डॉ. भाई केशवरावजी धोंडगे यांनी 1957, 1962, 1967, 1972, 1985, 1990 अशा तब्बल सहा विधानसभा निवडणुका जिंकल्या. एक अभ्यासू आणि लढवय्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली. त्यानंतर 1975 च्या आणिबाणीनंतर 1977 मध्ये त्यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवत दिल्लीतही आपल्या वक्तृत्वाची चुणूक दाखविली, असेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.

             ग्रामीण भागातील लोकसाहित्याचे अभ्यासक असलेल्या श्री.धोंडगे यांनी मुक्ताईसुत या नावाने विविध प्रकारचे विपुल लेखन केले आहे. ग्रामीण भागातील लोककलावंताला व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हावी यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून ते सातत्याने जागतिक गुराखी साहित्य संमेलनाचे आयोजन करतात. १९५७ ते १९९५ अशा दहा निवडणुका आणि ११ मुख्यमंत्री पाहिलेले केशवराव धोंडगे यांनी ४० पुस्तके लिहिली आहेत. विधिमंडळात त्यांनी भाषणे, औचित्याचा मुद्दा, तारांकित प्रश्न, लक्षवेधी ही सारी आयुधे वापरत भल्याभल्यांची भंबेरी उडवली, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

            या प्रस्तावावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री विक्रम काळे, एकनाथ खडसे, जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

०००० 

 

वृत्त क्र. 2364

 

डॉ. केशवराव धोंडगे यांनी विधिमंडळाची परंपरा अधिक समृद्ध केली

विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

 

            मुंबई. दि. 24 : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ.केशवराव धोंडगे यांनी आपल्या कार्यातून महाराष्ट्रह विधिमंडळाची परंपरा अधिक समृद्ध केली आहे, असे गौरवोद्गार विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी काढले.

            ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, माजी खासदार व माजी आमदार डॉ. भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त विधानसभेत त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी श्री. नार्वेकर बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार सदस्य सर्वश्री बाळासाहेब थोरात, भास्करराव जाधव, श्यामसुंदर शिंदे, हरिभाऊ बागडे त्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

            विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर म्हणाले,  डॉ. धोंडगे यांनी हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढ्यात तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी जनतेच्या न्याय्य हक्कासाठी अनेक आंदोलने केली. सन १९५७ ते १९९० दरम्यान पाच वेळा नांदेड जिल्ह्यातील कंधार मतदारसंघातून ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. सन १९७० मध्ये ते लोकसभेवर निर्वाचित झाले. एक अभ्यासू लोकप्रतिनधी म्हणून त्यांनी ख्याती मिळवली आहे.

            डॉ. धोंडगे यांनी शिक्षण संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गरीब आणि मागास भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या या कार्यामुळे अनेक मुले, मुली शिक्षण घेऊन प्रगतीच्या वाटेवर चालत आहेत, असे श्री. नार्वेकर यांनी नमूद केले.

००००

वृत्त क्र. 2363

 

विधिमंडळाचे ज्येष्ठ माजी सदस्य डॉ. केशवरावजी धोंडगे यांच्या

संसदीय कार्याचा विधानभवनात गौरव

 

            मुंबई, दि. 24 : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व माजी आमदार डॉ. भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांचा विधानभवनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

            यावेळी विधानसभेचे अध्यक्ष डॉ. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील,  महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, खनिकर्म मंत्री दादा भुसे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सहकार मंत्री अतुल सावे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधिमंडळातील विविध पक्षांचे गटनेते, विधानसभा सदस्य, सर्वश्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, दिलीप वळसे - पाटील, राजेश टोपे, आदित्य ठाकरे, यांच्यासह विधानसभा व विधानपरिषदेचे सदस्य उपस्थित होते.

            याप्रसंगी श्री. धोंडगे यांच्या पत्नी सौ. प्रभावती, चिरंजीव पुरुषोत्तम यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

            यावेळी विधानसभा अध्यक्ष डॉ. नार्वेकर यांनी श्री. धोंडगे यांच्या कार्याचा उल्लेख करीत शुभेच्छा दिल्या

0000 

वरिष्ठ स्वतंत्रता सेनानी डॉ. भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे का

शताब्दी के अवसर पर विधानसभा में  सम्मान

डॉ.केशवराव धोंडगे ने अपना जीवन मेहनतकशों, मजदूरों के लिए समर्पित किया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबई,  24 : वरिष्ठ स्वतंत्रता सेनानी डॉ. केशवराव धोंडगे ने मेहनतकशों, मजदूरों और गरीबों की समस्याओं के समाधान के लिए अपना जीवन समर्पित कर दिया, इन शब्दों के साथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज उनको सम्मानित किया। मुख्यमंत्री ने डॉ. केशवराव धोंडगे की लंबी उम्र की कामना भी की।

            वरिष्ठ स्वतंत्रता सेनानी, पूर्व सांसद एवं पूर्व विधायक डॉ. भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे की शताब्दी के अवसर पर आज विधान सभा में उनके संसदीय एवं सामाजिक कार्यों का सम्मान किया गया। इसी अवसर पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोल रहे थे। इस अवसर पर विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, नेता प्रतिपक्ष अजीत पवार,  सदस्य सर्वश्री बालासाहेब थोरात, भास्कर राव जाधव, श्यामसुंदर शिंदे, हरिभाऊ बागड़े ने भी अपने विचार व्यक्त किये।     

            मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा, जनता के न्याय के अधिकार के लिए श्री धोंडगे ने अनेक आंदोलन किये। उन्होंने ज़ोरदार माँग की थी कि दोनों सदनों के सत्र की शुरुआत 'वंदे मातरम' गीत से हो।   तदनुसार दिसंबर 1990 से दोनों सदनों के सत्र 'वंदे मातरम' गीत के साथ शुरू होने लगे। उन्होंने मराठवाड़ा विकास के लिए एक अलग मंडल स्थापित करने तथा लोहा तालुका के निर्माण के प्रयास किये। स्वतंत्रता सेनानियों के बच्चों के लिए सरकारी नौकरियों में आरक्षण के लिए भी उन्होंने विशेष प्रयास किये।

            नांदेड़ जिले में एसटी डिपो की माँग, विधान सभा के सेंट्रल हॉल में महात्मा फुले की तैलचित्र का अनावरण, भारत रत्न डॉ. बाबासाहेब अम्बेडकर का संपूर्ण साहित्य सरकार की ओर से प्रकाशित करना जैसी अन्य अनेक माँगें उन्होंने सरकार द्वारा मंजूर करवायीं। श्री धोंडगे ने दिखाया कि विविध संसदीय व्यवस्थाओं का उपयोग करते हुए सामाजिक कार्य कैसे किये और करवाये जाते हैं। श्री धोंडगे जैसे एक राजनेता और एक सामाजिक कार्यकर्ता हैं, वैसे ही वे एक पत्रकार और एक साहित्यकार भी हैं, मुख्यमंत्री श्री शिंदे ने इस अवसर पर कहा।

0000

Dr. Keshavrao Dhondge dedicated his life for workers and laborers: CM

 

Chief Minister Eknath Shinde in the Vidhan Sabha salutes to centenarian Freedom Fighter Dr. Bhai Keshavraoji Shankarrao Dhondge on his completion of 100 years eulogizing his commitment and dedication to workers and laborers

 

            Mumbai, Aug 24: Senior Freedom Fighter and centenarian Dr. Keshavrao Dhondge dedicated his life in solving the issues of laborers, workers and the poor sections, mentioned Chief Minister Eknath Shinde in the Vidhan Sabha today and prayed for his long life. Dhondge completed 100 years of his life and entered the 101st year.

            Senior Freedom Fighter, former MP and MLA Dr. Bhai Keshavraoji Shankarrao Dhondge was honored in the Vidhan Sabha today for his parliamentary and social work on the occasion of completing a century today. Speaking on this occasion Chief Minister Eknath Shinde eulogized his services, commitment and dedication to the working class and the poor and neglected sections of the society.

            On this occasion Speaker Adv. Rahul Narvekar, Leader of Opposition Ajit Pawar, Balasaheb Thorat, Bhaskarrao Jadhav, Shyamsundar Shinde, Haribhau Bagde and other MLAs also expressed their views in honor of Dr. Dhondge.

            Chief Minister Shinde said that Dr. Dhondge organized many agitations for the just demands of the people. He demanded that both the Houses of legislature should begin their business with chanting of Vande Matarm and it his demand was accepted and accordingly from December 1990 the business of both the Houses began with Vande Mataram. He took efforts for establishment of independent board for development of Marathwada, and creation of Loha taluka. He also made special efforts for getting reservation for wards of freedom fighters in government jobs.

            He was instrumental in getting the demands like ST Depot in Nanded district, unveiling portrait of Mahatma Jyotiba Fule in the Central Hall of Vidhan Sabha, publication of entire literature of Dr. Babasaheb Ambedkar by the government and so on, fulfilled by the government, He has shown the way to get various socially useful works using various legislative and parliamentary instruments and provisions. Dr. Dhondge besides being a successful politician and social activist, is a journalist and a litterateur, the Chief Minister said.

0000




No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...