Friday, February 11, 2022

 बारावी प्रात्यक्षिक परीक्षेसंदर्भात विशेष मार्गदर्शक सूचना

नांदेड (जिमाका) दि. 11 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, प्रकल्प व तत्सम परीक्षा प्रचलित पद्धतीप्रमाणे घेण्यात येणार आहे. या परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. प्रयोग वही (जर्नल) वरील कालावधीत सादर करावी लागणार आहे. या परीक्षेच्या अनुषंगाने कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विशेष मार्गदर्शक सूचना शिक्षण मंडळाने निर्गमीत केल्या आहेत.  

 

परीक्षा कालावधीत विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यामुळे अथवा अन्य वैद्यकीय अपरिहार्य कारणामुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, प्रकल्प व तत्सम परीक्षा देवू न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची परीक्षा लेखी परीक्षेनंतर 31 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. आउट ऑफ टर्नचा कालावधी याच कालावधीत समाविष्ट असेल. त्यामुळे आउट ऑफ टर्नसाठी स्वतंत्र कालावधी देण्यात येणार नाही.

 

विज्ञान, कला, वाणिज्य व व्यावसायिक शाखातील विषयांची श्रेणी, तोंडी व इतर अंतर्गत मूल्यमापन परीक्षा घेण्याची जबाबदारी  संबंधित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आली आहे. त्यामुळे श्रेणी, तोंडी व इतर अंतर्गत मूल्यमापन परीक्षा प्रचलित मूल्यमापन आराखड्यानुसार तसेच कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाची परिस्थिती विचारात घेऊन निर्धारीत कालावधीत पार पाडावी.


कोविड-19 विषाणुची पार्श्वभूमी विचारात घेता बहुतांश उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू ठेवण्यास कमी कालावधी मिळाल्याने निर्धारीत प्रात्यक्षिके पूर्ण करणे शक्य झाले नाही. ही बाब विचारात घेऊन इयत्ता बारावी परीक्षेंतर्गत अंतर्गत मूल्यमापन असलेल्या सर्व विषयांच्या परीक्षेबाबत पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.

 

कोविड-19 विषाणुची पार्श्वभूमी विचारात घेऊन विषयनिहाय प्रात्यक्षिकांची संख्या किमान 40 टक्के करण्यात आलेली आहे. या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अंतर्गत व बहिस्थ परिक्षक संबंधित उच्च माध्यमिक विद्यालय / कनिष्ठ महाविद्यालयातून घेण्यात यावी. ज्या कनिष्ठ महाविद्यालयात एका विषयासाठी एकापेक्षा अधिक विषय शिक्षक उपलब्ध नाहीत तेथे त्याच उपलब्ध विषय शिक्षकाने अंतर्गत व बहिर्स्थ परिक्षकाचे काम करावे. कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व संबंधितांनी कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.

 

या कलावधीत उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयात पिण्याच्या पाण्याची व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी. याशिवाय अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात येताना स्वत:ची पाण्याची बाटली व सॅनिटायझर सोबत ठेवावे. तसेच मास्क व लेखन साहित्य उदा पेन, पेन्सिल कंपास इत्यादी सुद्धा स्वत:सोबत आणावे.

 

प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करताना कोविड-19 च्या प्रादुर्भावासंदर्भातील सूचनांचे पालन करण्याच्यादृष्टिने उपलब्ध जागेचा विचार करून विद्यार्थ्यांच्या बॅचेस तयार कराव्यात. विद्यार्थ्यांना व अन्य घटकांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देतांना त्यांचे तापमान मोजण्यात यावे. तसेच महाविद्यालयातील संपूर्ण कालावधीत विद्यार्थी व सर्व संबंधितांनी मास्क वापरणे अनिवार्य राहील. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व शारीरिक अंतर राखले जाईल याची दक्षता घ्यावी. आरोग्य विषयक सर्व सूचनांचे पालन करावे. प्रात्यक्षिक परीक्षेच्यावेळी परीक्षा दालनात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने योग्य ती काळजी घ्यावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिले आहेत.

000000 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...