Friday, February 11, 2022

भोकरच्या सिंचन प्रश्नाला दिलासा देणाऱ्या

दिवशी प्रकल्पाचे कार्यादेश निर्गमीत   

 

·         600 हेक्टर सिंचन क्षमता असणारा मराठवाड्यातील पहिला सिंचन तलाव

 - मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

·         दिवशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी पूर्ण केल्याचा अधिक आनंद

-         पालकमंत्री अशोक चव्हाण 

 नांदेड (जिमाका), दि. 11 :- नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात बहुतांश भाग कोरडवाहू असून सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून वेळोवेळी केली जात होती. दिवशी परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या दिवशी सिंचन तलावाच्या कामाबाबत जलसंधारण विभागाने कार्यादेश निर्गमीत केले असून हे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. 

सिंचनाच्या सुविधाबाबत पालकमंत्री या नात्याने नांदेड जिल्ह्याच्यादृष्टिने एक व्यापक दूरदृष्टी आपण ठेवली आहे. जिल्ह्यातील विविध प्रकल्पासमवेत ज्या भागामध्ये कमी अधिक क्षमतेनुसार जेवढे प्रकल्प, सिंचन तलाव करता येतील तेवढे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. भोकर मधील दिवशी भागातील सुमारे 600 हेक्टर क्षेत्राला हा सिंचन तलाव सिंचनाच्या सुविधा नव्याने उपलब्ध करून देत असल्याने मला अधिक आनंद असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

 

दिवशी (बु.) सिंचन तलावासाठी 37 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हा सिंचन तलाव मराठवाड्यातील 251 ते 600 हेक्टर सिंचन क्षमता असणारा पहिला प्रकल्प आहे. दिवशी (बु.) सिंचन तलावाची प्रशासकीय मान्यतासह इतर सर्व मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.  या तलावाचे काम तात्काळ सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

जलसंधारण विभागांतर्गत प्रथमच अशा प्रकारच्या प्रकल्पांना मंजुरी देऊन जिथे-जिथे नैसर्गिक संसाधन उपलब्ध आहेत त्याठिकाणी लहान-मोठे सिंचन तलाव निर्माण करून त्यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरीता   श्री. गडाख यांनी हा धाडसाचा निर्णय घेतला आहे. या सिंचन तलावासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याने प्रकल्पाच्या मंजुरी देणे सुलभ झाले असल्याचे श्री. गडाख यांनी सांगितले.

000000


No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...