Tuesday, January 4, 2022

वृत्त क्रमांक 5

 बचतगटातील महिला जेव्हा शाळेतील सत्काराने भारावून जातात

 

·  पर्यावरण विभागाच्यावतीने पर्यावरण जागृतीसाठी कापडी पिशव्यांचे वाटप  

       

नांदेड (जिमाका) दि. 4 :- पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या पासून मुक्ती देण्याच्या उद्देशाने पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्यावतीने कापडी पिशव्यांची मोहिम मोलाची आहे. या मोहिमेंतर्गत महिलांच्या हाताला काम मिळावे, या उद्देशाने बचतगटांना कापड देवून कापडी पिशव्यांची निर्मिती हा अत्यंत अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी केले. कापडी पिशव्यांचा वापर व त्याचे महत्त्व शालेय विद्यार्थ्यांपर्यंत रुजावे, पर्यावरण संतुलनाचा हा विचार घराघरात पोहचावा या उद्देशाने आज नांदेड जिल्ह्यात विष्णुपूरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेपासून कापडी पिशवी वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजेंद्र पाटील, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड, जिल्हा समुपदेशक बालासाहेब कच्छवे, मुख्याध्यापक एन. एस. दिग्रसकर आदी उपस्थित होते.

 

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने प्लॉस्टिक बॅगला मुक्ती मिळावी व कापडी पिशव्या वापरण्याची सवय तळागाळापर्यंत पोहचावी या उद्देशाने विशेष मोहिम हाती घेतली. यात माविमच्या अंतर्गत महिला बचतगटांना पिशव्या शिवण्याचे काम देऊन पर्यावरण संतुलनासह रोजगार निर्मितीलाही चालना दिली. नांदेड येथील साबेर महिला बचतगटातील महिलांनी हे काम अत्यंत कुशलतेने करून पिशव्यांची उपलब्धता वेळेच्या आत करून दिली. या अभिनव उपक्रमातील शिलेदार ठरलेल्या साबेर महिला बचत गटातील सुफिया शेख तय्यब अन्सारी यांचा उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या हस्ते प्रातिनिधीक सत्कारही करण्यात आला. सुमारे सात वेगवेगळ्या बचत गटांकडून 30 हजार कापडी पिशव्या शिऊन घेण्यात आल्याची माहिती माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. 

पर्यावरण संतुलनासह अनेक समाज उपयोगी उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांचे योगदान अत्यंत महत्वाचे असते. विद्यार्थी असूनही शालेय मुले खऱ्या अर्थाने लोकशिक्षकाची भूमिका आपल्या वर्तनातून समाजापर्यंत पोहोचू शकतात. प्लॉस्टिक कॅरीबॅगपासून मुक्ती घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा पुढाकार मोठा बदल देऊ शकतो, अशा विश्वास जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी व्यक्त केला. आपल्या भवतालाला, परिसराला समजून त्याला पूरक असे आपले वर्तन ठेवणे हे खरे शिक्षण असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा समुपदेशक बालासाहेब कच्छवे यांचेही यावेळी समयोचित भाषण झाले. यावेळी 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थी व विद्यार्थींनीचे लसीकरण मोहिमेचाही शुभारंभ करण्यात आला.

00000




No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...