Thursday, December 30, 2021

 नागरिकांनी घराबाहेर न पडता

नववर्षाचे स्वागत साधेपणाने करावे

-         जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर

       

नांदेड (जिमाका) दि. 30 :-  कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये "ओमिक्रॉन" हा नवीन विषाणू आढळून आला आहे. यामूळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणूचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये पसरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने खबरदारी म्‍हणून एकत्र न येता यावर्षी 31 डिसेंबर 2021 (वर्ष अखेर) व नूतन वर्ष 2022 चे स्‍वागत घराबाहेर न पडता अत्‍यंत साधेपणाने घरच्या घरीच कराअसे आवाहन जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

मदत व पुनर्वसन विभागाच्या निर्देशानुसार राज्यात रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली असून या आदेशाचे पालन करावे. कोवीड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. 31 डिसेंबर व नूतन वर्ष 2022 च्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसन क्षमतेच्या 50 टक्के पर्यंत तर खुल्या जागेत उपलब्ध क्षमतेच्या 25 टक्केच्या मर्यादित उपस्थित राहण्यास परवानगी राहील. या ठिकाणी गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सींग राखणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर तसेच त्या ठिकाणी निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिक व 10 वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे. 31 डिसेंबरच्या दिवशी नागरीकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी करु नये. सार्वजनिक ठिकाणी त्रिसुत्रीचा वापर करावा. विशेषतः मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्‍स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी इत्‍यादी ठिकाणी देखील नागरिकांनी गर्दी करु नये. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये. मिरवणूका काढण्यात येऊ नये. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतिषबाजी करु नये. ध्वनिप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. कोविड-19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व 31 डिसेंबर व नूतन वर्ष 2022 सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्याचे देखील अनुपालन करावे लागेल अशा मार्गदर्शक सूचना जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...