Sunday, December 19, 2021

 सकारात्मक विचार आणि कृतीतच जीवनातील शांतीची पावले

- डॉ. जॉन चेल्लादुराई 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- मानवी आयुष्यातील जितक्या चांगल्या सकारात्मक गोष्टी आपल्याला करता येतील तेवढ्या करण्याचा ध्यास आपण घेतला पाहिजे. आपल्या नंतरही याच गोष्टी चिरकाल टिकणाऱ्या आहेत. स्वत:ची ओळख आपण करून घेतांना पाच तत्वांना अनुसरून ज्या काही अधिकाधिक चांगल्या गोष्टी आपल्याला करता येतील त्या करण्यावर आपण भर दिला पाहिजे. यातच मानवी जीवनात शांतीची पावले दडलेली आहेत, अशी साधी उकल पीस ॲक्टिव्हिस्ट डॉ. जॉन चेल्लादुराई यांनी करून दिली. 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रिव्हर्स ऑफ इंडिया या उत्सवाच्या औचित्याने "पीस वॉक"चे आयोजन आज गोदावरीच्या काठावरील बंदाघाट येथे करण्यात आले होते. या अभिनव उपक्रमाची सुरूवात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली. डॉ. जॉन चेल्लादुराई यांच्यासमवेत प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत, मनोज बोरगावकर, प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी, आदी मान्यवर उपस्थित होते. 

मनुष्याच्या जीवनातील आकाशाचे तत्व आपण आपल्या माथ्यामध्ये पाहतो. आपण जेवढे विचार करू तेवढ्या विचारांसाठी आकाशही आपल्याला कमी पडेल. सकारात्मक विचार असतील तर हे आकाशाचे तत्व मानवाला मानवी संवेदनेशी, या पृथ्वीतला च्या, या चराचराच्या सुसंगत असेच कृती करण्याला बाध्य करेल. नकारात्मक विचार हे तेवढ्याच विनाशेच्या खाईत लोटणारे असेल. याच पद्धतीने अग्नी, वायू, जल ही तत्वे आपण ओळखली पाहिजे. मनुष्य हा देहाच्या स्वरुपात जरी उरत नसला तरी त्याने केलेल्या भल्या-बुऱ्या कृतीचे अंश हे या तत्वात कधीही न सरणारे असतात, असे स्पष्ट करून डॉ. जॉन यांनी गोदावरीच्या काठावर चालणाऱ्या पावलांना सकारात्मकतेचे बळ दिले. 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा अंतर्गत रिव्हर्स ऑफ इंडियाच्या अनुषंगाने आम्ही विविध उपक्रम राबविताना वेगळी अनुभूती घेत आहोत. आज बंदाघाट येथे गोदावरीच्या काठाने मानवी जीवन मूल्यांसह आपल्यातील पंचमहाभूते असलेल्या तत्त्वांची खूप वेगळी ओळख करून घेता आली, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. 

जीवनाचे मूल्य जर ओळखायचे असेल तर आपल्या परिसरात असलेल्या नदीशी, तिच्या भवतालाशी एकरूप व्हावे लागते. नदी माणसाला जगण्याचे मूल्य देते, संस्कार देते व संस्कृतीही देते. असे असूनही मानवी जीवनशैली व त्याचे वर्तन नदीला जीवंत ठेवण्यासाठी पोषक मात्र राहिले नाही. नदी हसली नदी रुसली या आपल्या कवितेचा संदर्भ देत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी वास्तवतेला हात घातला. परिस्थिती कितीही निराशाजनक असली तरी आशावाद हा सोडता कामा नये. प्रत्येकाने आशावादी राहून निसर्गाशी, मानवी जीवन मूल्याशी, पंचत्वाशी सुसंगत जीवनशैली ठेवली तर नद्यांसह चराचरही मोकळा श्वास घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी मनोज बोरगावकर यांनी गोदावरीचे भावविश्व उलगडून दाखवत आपण आता अधिक जबाबदार होऊन नद्यांकडे पाहिले पाहिजे, असे सांगितले. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. इन्टॅक्कचे सचिव प्रा. चंद्रकांत पोतदार, सुरेश जोंधळे, वसंत मैय्या, लक्ष्मण संगेवार, माहिती अधिकारी श्वेता पोटुडे, माहिती सहाय्यक अलका पाटील आदी उपस्थित होते.
0000





No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...