सामान्य माणसाच्या जगण्यातील आव्हाने कमी करण्यासाठी कटिबद्ध
- पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड, (जिमाका) दि. 15:- नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी भौतिक सुविधेबरोबर इतर सेवा-सुविधाही तेवढ्याच आवश्यक असतात. यादृष्टिने नांदेड महानगरातील गोदावरी परिसरातील विविध घाटांच्या सुशोभीकरणापासून, राष्ट्र पुरुषांच्या पुतळे व स्मारकांपासून आपण नागरिकतेला अधिक सजग करण्याचा प्रयत्न केला आहे. विसावा गार्डन हे सुद्धा त्या सजगतेचेच प्रतिक आहे. भारतातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार पद्मविभुषण आर. के. लक्ष्मण यांच्या नजरेतून साकारलेल्या कॉमन मॅनचा पुतळा आता माता गुजरीजी विसावा उद्यानात उभारण्यात आल्याने सामान्य माणसांच्या प्रति महानगरपालिकेचे उत्तरदायित्व अधिक वाढले असून परस्पर विश्वासाचा आणि विकासप्रती कटिबद्धतेचे हे आदर्श मापदंड ठरल्याचे गौरद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काढले.
नांदेड येथील माता गुजरीजी विसावा उद्यानात आर. के. लक्ष्मण यांनी साकारलेल्या कॉमन मॅनच्या शिल्पाचे अनावरण आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, बालाजी कल्याणकर, महापौर मोहिणी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने आदी मान्यवर उपस्थित होते.
नांदेड महानगरामध्ये कॉमन मॅनच्या पुतळ्याची भर टाकू अशा शब्द दिला होता. आर. के. लक्ष्मण यांना मी स्वत: भेटलेलो आहे. त्यांच्या परिवाराशी मी भेटलेलो आहे. सामान्य माणसाच्या नजरेतून एखाद्या घटनेकडे कसे पाहायला पाहिजे, याचे प्रतिक म्हणजे आर. के. लक्ष्मण यांनी रेखाटलेला कॉमन मॅन आहे. या कॅमन मॅनच्या पुतळ्याचे उद्घाटन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात होणे हे एक प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूल्यांना वंदन करण्यासारखे असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांची दररोज सकाळी
होणारी तारांबळ रोखण्याच्या उद्देशाने त्यांना एक स्वतंत्र ऊन, वारा, पाऊसापासून
संरक्षण करणाऱ्या जागेची उपलब्धी करुन दिली असून त्यांचा अनौपचारिक शुभारंभही
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात
नांदेड जिल्ह्यातील व्यंगचित्रकारांचा आणि वृत्तपत्र विक्रेत्यांचाही सत्कार
करण्यात आला. महापौर येवनकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. व्यंगचित्रकारांतर्फे
बाबुराव गंजेवार यांनी आपले मनोगत व्यक्त करुन आर. के. लक्ष्मण यांच्या जीवन
कार्याची माहिती दिली. यानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते स्त्री
रुग्णालयातील अत्याधुनिक अल्ट्रा सोनोग्राम मशिन (युएसजी), विशेष नवजात शिशू
अतिदक्षता केंद्र, थैलेसिमीया व ऑक्सीजन प्लांटचे उद्घाटन करण्यात आले.
0000
No comments:
Post a Comment