आठवड्याभरात कार्यरत होणार नांदेडचे जंबो कोविड सेंटर !
-
पालकमंत्री
अशोक चव्हाण
नांदेड जिल्ह्यातील कोरोना
परिस्थितीचा पालकमंत्र्याकडून आढावा
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या आजच्या आढावा बैठकीत नियोजित जंबो कोविड सेंटरच्या उभारणीवर चर्चा झाली. कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नांदेड येथे अस्थायी जंबो कोविड सेंटर उभारले जाते आहे. या सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधेसह कोरोनावरील आवश्यक त्या उपचार सुविधा उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील खाटांची उपलब्धता, ऑक्सिजन व रेमडेसिवीरसारख्या औषधांचा मागणी व पुरवठा आदींबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी संपर्क साधून, नांदेड जिल्ह्याच्या मागणीनुसार दररोज २ हजार रेमडेसिवीरचा पुरवठा करण्याबाबत निर्देश दिले. जिल्ह्यात डॉक्टर व नर्सेसची कमतरता नसून, आवश्यक तिथे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसाठी खासगी डॉक्टरांचीही सेवा घेतली जात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.
नांदेड जिल्ह्यातील कोरोना लसीकरण मोहिमेवर अधिक जोर देण्याचे
निर्देशही अशोक चव्हाण यांनी या बैठकीत दिले. त्यासंदर्भात आवश्यकता भासल्यास
स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याची सूचनाही त्यांनी मांडली. जिल्हाधिकाऱ्यांनी
लसीकरण मोहिमेची माहिती देऊन नांदेड जिल्ह्याला अधिक लसींचा पुरवठा होणे आवश्यक
असल्याचे सांगितले. जिल्ह्याला अधिक प्रमाणात लसी आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी
शासनाकडून योग्य ती पावले उचलली जातील. कोरोनावरील उपाययोजनांसाठी निधीची कमतरता
नाही. गरज भासेल तिथे शासनाकडून पुरेशी मदत मिळवून दिली जाईल,
असेही ते म्हणाले.
कोरोनासंदर्भात शासनाने केलेले नियोजन व कोरोना उपचारांच्या
सुविधेबाबत नागरिकांना अद्ययावत माहिती मिळावी, यासाठी
जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी माध्यमांची मदत घ्यावी, असे
अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. कोरोनावरील उपचारांच्या सुविधांच्या उपलब्धतेसंदर्भात
माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन नंबर कार्यरत करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. बाजारात सध्या हरभरा, गहू, मोठी ज्वारी आदी शेतीमालाची आवक सुरू असून,
कोरोनाच्या आड भाव पाडले जाणार नाहीत, याबाबत
पुरेशी दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
No comments:
Post a Comment