Tuesday, April 6, 2021

 

सर्व हॉटेल चालक, अन्न पदार्थ उत्पादक-वितरक

विक्रेत्यांना कोविड-19 तपासणी बंधनकारक

 

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- जिल्ह्यातील सर्व हॉटेल चालक, अन्न पदार्थ उत्पादक-वितरक विक्रेत्यांना आणि अशा व्यवसायाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या सर्व कामगार, मालक यांना  कोविड-19 ची तपासणी करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे  या तपासणी समवेत सर्व कामगार मालकांनी मास्क वापरणे, हॉटेल- पेढीची स्वच्छता -ग्राहकांमधील सुरक्षित अंतर स्वच्छतेची काळजी अनिवार्य करण्यात आली असल्याचे अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) प्र.म.काळे यांनी सांगितले.

 

याचबरोबर अन्न पदार्थाची गुणवत्ता, दर्जा यांच्याबद्दल सर्व संबंधित व्यावसायिकांनी दर्जाबाबत जागरुकता ठेवून मुदत बाह्य अन्न पदार्थाची विक्री होवू नये, याबाबत दक्षता घेतली पाहिजे. हॉटेल, रेस्टॉरंट, बार, बेकरी व मिठाई विक्रेते यांनी विहित वेळेत पार्सल सेवा देताना शिळे अन्न, पदार्थ, दर्जाहिन अन्नपदार्थाचा वापर कटाक्षाने टाळावा असे त्यांनी स्पष्ट केले . पदपथावरील तयार अन्नपदार्थ विक्रेत्यांनी, निर्धारीत वेळेत केवळ पार्सल सेवा पुरविणे आवश्यक आहे. अन्न प्रक्रिया उद्योग, उत्पादक, रिपॅकर्स यांनी यांची काटेकोर अंमलबजावनी करताना सर्व कामगारांच्या वैद्यकीय तपासण्या, लसीकरणे सर्व प्राथम्याने पार पाडावीत असे स्पष्ट केले आहे.

 

सर्व अन्न व्यवसाय चालकांकडून नियमांची, आदेशाची योग्य अंमलबजावनी होते किंवा कसे याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी खातरजमा करुन दोषीविरुध्द कडक कायदेशिर कारवाई केली जाईल असे सहायक आयुक्त प्र.म.काळे यांनी सांगितले आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...