उर्ध्व पैनगंगा (इसापूर धरण) प्रकल्पातून
रब्बी हंगामासाठी 27 नोव्हेंबरपासून पाणीपाळी
नांदेड (जिमाका) 20 :- कालवा सल्लागार समितीच्या सर्व शासकीय सदस्यांसमवेत दृकश्राव्यद्वारे (व्हिसी) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली 19 नोव्हेंबर रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीत ठरल्यानुसार नियोजन करण्यात आले असून इसापुर धरणामधील उपलब्ध पाणीसाठ्यानुसार रब्बी हंगामासाठी पाणीपाळी क्रमांक एक ही शुक्रवार 27 नोव्हेंबर 2020 पासून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील लाभधारक व इसापूर धरण जलाशय, अधिसुचित नदी, नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही व मंजूर उपसा सिंचन योजनाधारकांना यांची नोंद घ्यावी, असे आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 नांदेडचे कार्यकारी अभियंता पी. एल. भालेराव यांनी केले आहे.
सन 2020-21 मधील रब्बी हंगामात उर्वरीत पाणी पाळ्या देण्याचे व उन्हाळी हंगामाचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीअंती करण्यात येईल. उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावीत कार्यक्रमानुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल.
पाणी पाळ्या चालू होण्याचा संभाव्य दिनांक पुढीलप्रमाणे आहे परंतू पाऊस, कालवाफुटी व इतर अपरीहार्य कारणामुळे वेळापत्रकात बदल करण्यात येईल. रब्बी हंगाम 2020-21 साठी पाणीपाळी क्र.1 इसापूर उजवा कालवा व इसापूर डावा कालवा 27 नोव्हेंबर 2020 रोजी असा राहील.
या आवर्तनासाठी पुढीलप्रमाणे अटी व शर्तीची पूर्तता करणे आवश्यक राहील. जलसंपदा विभागाने
वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सर्व शर्ती व अटी
बंधनकारक राहतील, याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी. आवर्तन प्रारंभ होण्याच्या व
समाप्त होण्याच्या दिनांकामध्ये क्षेत्रीय परिस्थितीनुसार थोडाफार बदल होण्याची
शक्यता नाकारता येत नाही. रब्बी हंगामी, दुहंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, मंजूर उपसा, मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी, नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे. त्यांनी आपले पाणी
मागणी अर्ज विहीत नमुन्यात व विहीत दिनांकापुर्वी संबंधित शाखा कार्यालयात दाखल
करावेत. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आरच्या पटीत असावे. कालवा संचलन
कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील.
पाणीपट्टी न भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजुर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रीक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जावून ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास या कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकरण्यात येतील. शेतचारी स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकांची राहील. उडाप्याच्या, अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणी पाळी सुरू असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टरद्वारे पाणीउपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले आहे. त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी मागणी, वसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही. या सर्व अटी व नियमांचे पालन करून विभागास सहकार्य करावे, असे आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 नांदेडचे कार्यकारी अभियंता पी. एल. भालेराव यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment