Thursday, September 17, 2020

 

 

हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभासमोर पोलीस दलाच्या पथकाने सावधान सलामी, शोकशस्त्र, सलामी शस्त्र आणि मा





मराठवाडा मुक्ती संग्रामातील बलिदान आणि त्यागाची मूल्य

नव्या पिढीपर्यंत पोहोचवू यात - पालकमंत्री अशोक चव्हाण

माझे कुटूंब माझी जबाबदारी स्विकारण्यातच कोरोनामुक्तीचा मार्ग

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- वयाची पन्नास वर्ष पूर्ण करणाऱ्या आजच्या पिढीने मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यातील आपल्या पूर्वजांनी दिलेल्या बलिदानाच्या गोष्टी आपल्या आई-वडिलांकडून ऐकल्या आहेत. मात्र ज्या पिढीने मुक्तीसंग्रामाचा हा लढा, हा जाज्वल्य इतिहास अनुभवला नाही त्या पिढीपर्यंत हा त्याग आणि यातील निस्वार्थ सेवेचे मुल्य पोहोचविण्याची महत्वपूर्ण जबाबदारी आपली आहे या शब्दात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जाणीव करुन दिली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 72 वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात ते बोलत होते.   

येथील माता गुजरीजी विसावा उद्यान येथे हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मानवंदना व पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकरमहापौर दिक्षाताई धबालेस्वातंत्र्य सेनानी नारायणराव भोगावकरविठ्ठलराव जोंधळेसर्वश्री आमदार अमर राजूरकरबालाजी कल्याणकरमोहनराव हंबर्डेमाधवराव पाटील जवळगावकररावसाहेब अंतापूरकरशामसुंदर शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळीजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरपोलीस अधिक्षक विजयकुमार मगरमनपा आयुक्त डॉ. सुनिल लहानेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णीअपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड व इतर मान्यवरांनी पुष्प अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.   

एका कठीन काळातून आपण सारे जात आहोत. कोरोना सारख्या महामारीने अनेक आव्हाने निर्माण केली आहेत. अशा या कठीन काळात सर्वांनी एक होऊन या महामारीतून प्रत्येकाला अधिक सुरक्षित कसे ठेवता येऊ शकेल याचाच ध्यास घेतला पाहिजे. एका अर्थाने हा कोरोनापासून मुक्तीचाच लढा असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगून मागील सहा महिन्यांपासून यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या वैद्यकीय, महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आदी  संबंधित विभागातील कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरवही केला. 

शासन पातळीवर आम्ही शर्तीने प्रयत्न करीत आहोत. नांदेड जिल्ह्यात आपण मागच्या महिन्यात जिल्हा रुग्णालयात दोनशे खाटांच्या अद्ययावत बाह्य रुग्ण विभागाची सुरुवात केली आहे. यासमवेत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय  व रुग्णालयात नुकतेच आपण 80 खाटाचे दोन आयसीयू वार्ड अद्यावत केले आहे. यात 64 खाटा या आयसीयूच्या तर 16 खाटा या ऑक्सिजनच्या तयार केल्या आहेत. पुर्वीच्या 170 आयसीयू खाटांमधून ही नवी भर पडली असून आता अतीगंभीर जे बाधित आहेत त्यांच्यावर येथे प्राधान्याने उपचार केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

शासन एका बाजूला प्रत्यनाची पराकाष्टा करत आहे. आपण आता नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यासाठी तेवढ्याच जागरुकतेने सहकार्यासाठी पुढे सरसावले  पाहिजे, अशी अपेक्षा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. शासनाने नुकतीच माझे कुटूंब-माझी जबाबदारी ही मोहिम हाती घेतली असून आता यात प्रत्येक घरातील व्यक्तींनी सहभाग घेतला पाहिजे. ही प्रक्रिया सुद्धा राष्ट्र निर्माणा इतकीच पवित्र आणि महत्वाची व तेवढीच मोठी राष्ट्रसेवा आहे. राज्यातील प्रत्येक कुटुंबाच्या सदस्यांपर्यंत शासनाचा व समाजाचा प्रतिनिधी पोहोचून आपण कोरोना निर्मुलनासाठी मोठी तपासणी मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेला जिल्ह्यातील प्रत्येक घर आपला सहभाग देईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. मोठ्या आशेने हा देश आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा करीत आहे. ही अपेक्षा फक्त ज्याची त्याने स्वत:ची काळजी स्वत: घेण्यापूरती असून माझे कुटूंब-माझी जबाबदारी समर्थपणे सांभाळायची आहे. प्रत्येक घर यासाठी पुढे आले तरच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.  

न्यवरांनी आदरांजली वाहिल्यानंतर हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी दिली. पोलीस वाद्यवृंद पथकानेही बिगूल धून वाजवून सलामी दिली. यावेळी सर्व उपस्थितांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली. त्यानंतर राष्ट्रध्वजाचे वंदन आणि राष्ट्रीय सलामी झाली. 

याप्रसंगी जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी, जिल्हा परिषद, महापालिकेचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वातंत्र्य सेनानी व जेष्ठ नागरिकांची भेट घेवून त्यांना मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देताना त्यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. राखीव पोलीस निरीक्षक सय्यद जमील यांनी परेड कमांडर म्हणून संचालन केले. तर व्यंकटेश चौधरी यांनी सुत्रसंचालन केले.  

0000


 

 

No comments:

Post a Comment

विकसित महाराष्ट्र २०४७ Vision Document तयार करण्याच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात सर्वसामान्य जनतेचा सहभाग महत्वाचा असून शासनाकडू...