Thursday, August 6, 2020

वृत्त क्र.  734  

जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून

सरकारी सेवा केंद्र व आधार नोंदणी केंद्र चालू ठेवण्यास परवानगी

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- कोविड-19 च्या प्रसाराला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंडसंहिता 188 नुसार जिल्ह्यातील विविध आस्थापनांसह सरकारी सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र चालू ठेवण्यास मनाई केलेली होती. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत काही निर्बंध सुकर करण्यासह नियम व अटींच्या अधिन राहून टाळेबंदीचा कालावधी दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत वाढवून मार्गदर्शक सुचना व निर्देश मा. मुख्य सचिव यांनी निर्गमीत केले आहेत. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात यापूर्वी 19 जुलै रोजी दिलेल्या आदेशातील अटी व शर्ती जशास तसे लागू करुन संपूर्ण जिल्ह्यात टाळेबंदीचा कालावधी पुढील आदेशापर्यंत वाढविण्यात आला आहे. जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र, सी.एस.सी. केंद्र, महा ई-सेवा केंद्र इत्यादी चालू आहेत. तथापि याठिकाणी बायोमेट्रिक पद्धतीने नवीन आधार नोंदणी, दुरुस्तीचे कामे बंद होती. आता जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी हे केंद्र खालील नमूद अटी व शर्तीच्या आधारे चालू करण्यास परवानगी दिली आहे. यात खालील अटींचा समावेश आहे.

·         नांदेड जिल्ह्यातील चालू असलेल्या व भविष्यात नव्याने निर्माण होणा-या प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) मध्ये आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र चालू ठेवण्यास परवानगी असणार नाही.

·         आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र येथील कर्मचा-यांनी मास्क, ग्लोव्हज, फेस शिल्ड, सॅनिटायझर, कापूस, टिशु पेपर, टिशु पेपरबॅग इ. चा नियमित वापर करावा.

·         बायोमेट्रीक डिव्हाईस, दरवाज्याचे हॅण्डल्स, नोब्स, टेबल, खुर्ची इ. चे सातत्याने निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करत रहावे.

·         आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र येथील कर्मचा-यांनी नियमितपणे सॅनिटायझरचा वापर करावा तसेच साबणाने हात स्वच्छ धुवावेत.

·         कर्मचा-यांनी काम करताना डोळे, नाक व तोंडाला स्पर्श करणे कटाक्षाने टाळावे.

·         सर्व आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र याठिकाणी येणा-या ग्राहकांना बायोमेट्रीक उपकरणाचा वापर करण्यापूर्वी व वापर केल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुण्यासाठी प्रेरित करावे व त्यासाठी ग्राहकांना साबण व पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे.

·         बायोमेट्रीक उपकरण निर्जंतुक (सॅनिटाईज) करताना वापरलेला कापसाचा बोळा पेपर कव्हरमध्ये ठेवण्यात यावा आणि तो काळजीपूर्वक व पुरेशी दक्षता घेऊन नष्ट करण्यात यावा.

·         ग्राहकांना त्यांचे नाक व तोंडावर मास्क, स्वच्छ रुमाल बांधणेबाबत सक्ती करावी तसेच रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांमध्ये पुरेसे सामाजिक अंतर राहील यादृष्टीने मार्कींग करण्यात यावे. ग्राहकांना सामाजिक अंतराचे पालन करणेबाबत वारंवार सूचना द्याव्यात.

·         सर्दी, ताप व श्वासोच्छवास घेण्यास त्रास होणे इ. कोवीड-19 ची लक्षणे असलेल्या कर्मचा-यांना तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात यावे.

·         आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र उपलब्ध सेवा व त्या सेवांचे दरपत्रक असलेला फलक प्रदर्शित करावा.

·         युआयडीएआय (UIDAI) कडून वेळोवेळी देण्यात येणा-या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

·         आधार कॅम्प तसेच कोणत्याही प्रकारच्या शिबीरांचे आयोजन करण्यात येऊ नये.

·         आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र यांनी एका वेळेस जास्तीत जास्त तीन/चार ग्राहकांना काउंटरसमोरील रांगेत उभे राहण्याची परवानगी द्यावी. व रांगेतील ग्राहकांचे काम झाल्याशिवाय पुढील ग्राहकांना रांगेत उभे राहण्यास परवानगी देऊ नये. यासाठी आवश्यतेनुसार ग्राहकांना टोकनचे वाटप करण्यात यावे. गर्दी होणार नाही यादृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी.

·         65 वर्षांवरील नागरिक व 10 वर्षांखालील मुले, दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला यांनी घरीच राहणे आवश्यक असल्याने त्यांना आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र याठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्यास मनाई असेल.

·         तसेच या कार्यालयाचे संदर्भिय आदेशानुसार देण्‍यात आलेल्‍या निर्देशाचे/सूचनाचे पालन करणे बंधनकारक राहील.

    या आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व  आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंडसंहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्‍यात येईल व कारवाई करण्‍यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

000000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1129 लोकसभेसाठी 67.81 तर विधानसभेसाठी 69.45 टक्के मतदान  विधानसभेसाठी भोकर येथे सर्वाधिक 76.33 तर नांदेड उत्तरमध्ये 60.6 सर्वात...