Friday, July 31, 2020


वृत्त क्र. 715  
जिल्हा परिषदेच्या शाळांचा
दहावी परीक्षेचा यावर्षी वाढला निकाल
नांदेड (जिमाका) दि. 31 :- माध्यमिक शालांत परीक्षेत (इयत्ता दहावी) यावर्षी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी वाढली असून गतवर्षी शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या कार्यशाळा आणि विशेष अभियानाची ही फलनिष्पत्ती आहे. जिल्हा परिषदेच्या 70 पैकी 65 शाळांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत निकाल 26 टक्के वाढला असून अ श्रेणीत 190 ब श्रेणीत 232 तर पास श्रेणीत 165 विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.
आदिवासी दुर्गम क्षेत्रातील जिल्हा परिषद हायस्कूल कन्या किनवटचा गतवर्षीच्या निकाल 0 होता तर यावर्षीचा निकाल 70 टक्के आहे. जिल्हा परिषद हायस्कूल बोधडीचा निकाल गतवर्षी 28 टक्के होता . यावर्षी 89 टक्के झाला आहे. जिल्हा परिषद हायस्कूल मांडवीचा निकाल गतवर्षी 39 टक्के होता तो यावर्षी 90 टक्के झाला आहे.जिल्हा परिषद हायस्कूल मरखेल तालुका देगलुर ,जिल्हा परिषद हायस्कूल बिलोली व जिल्हा परिषद हायस्कूल कलंबर वगळता इतर सर्व शाळांमध्ये निकालाची टक्केवारी भरघोस वाढली आहे.
सन 2018-19 या वर्षात गणित, विज्ञान, इंग्रजी विषय शिकवणारे शिक्षक व मुख्याध्यापकांच्या दोन कार्यशाळा घेण्यात आल्या. तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, शिक्षणाधिकारी (प्रा.) प्रशांत दिग्रसकर व शिक्षणाधिकारी बी.आर. कुंडगीर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेमध्ये तज्ज्ञ शिक्षकांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.
पहिली कार्यशाळा दिवाळीपूर्वी व दुसरी कार्यशाळा दिवाळीनंतर परीक्षेआधी एक महिन्यापूर्वी घेण्यात आली. या कार्यशाळेत शाळानिहाय व विषय निहाय आढावा घेऊन विद्यार्थ्यांची अनुत्तीर्ण होण्याची कारणे शोधली. कोणत्या विषयात विद्यार्थी मागे पडतात आणि का मागे पडतात याची कारणमीमांसा करून निकाल वाढविण्यासाठीचा कृती कार्यक्रम तयार करण्यात आला. संपूर्ण दिवाळी सुट्टीत सुट्टी न घेता शिक्षक व विद्यार्थी शाळेत उपस्थित राहिले. प्रशासनाच्या आवाहनाला दिलेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. सोशल मीडियाचा वापर झेडपी स्टॅंडर्ड टेन नॉर्थ व साउथ असे व्हाट्सअपचे दोन ग्रुप केले त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी हे एडमिन होते. दोघेही दररोज त्यावर टाकण्यात येणारा प्रतिसाद पाहत शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शिक्षकांना प्रोत्साहन देत, त्यामुळे शिक्षक अधिक जोमाने कामाला लागले.
कॉपीमुक्त परीक्षा आणि निकालात वृद्धी हे ध्येय ठेवून अध्यापनाच्या दिशा निश्चित केल्या. यावर्षी वाढलेली निकालाची परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी (प्रा.) प्रशांत दिग्रसकर व शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर यांनी सांगीतले.
0000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...