Friday, June 12, 2020

वृत्त क्र. 544



19 लाख 44 हजार किंमतीचा गुटखा जप्त
प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री केल्यास कारवाई  
नांदेड (जिमाका) दि. 12 :- देगलूर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रकमध्ये वजीर गुटखा 40 बोरी प्रत्येक बोरीमध्ये 6 छोटया बॅग, बॅगमध्ये 54 पॅकेट असे एकत्रीत 12 हजार 960 पॅकेट किंमत एकुण  19 लाख 44 हजार किंमतीचा आढळून आला असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थाची साठवणूक, वाहतूक, विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असून अन्नपदार्थाची कोणीही छुप्या, चोरट्या पद्धतीने विक्री, उत्पादन, साठा, वाहतुक करु नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.
देगलूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला ट्रक क्र. एमएच 18- अेअे 1666 या वाहनातील प्रतिबंधित अन्न पदार्थाची 12 जून रोजी अन्न सुरक्षा अधिकारी सुनिल जिंतूरकर यांनी ही तपासणी केली आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोमीनपुरा येथील आरोपी वाहन मालक गुलामखान गौसाखान व कंधार तालुक्यातील गउफळ आंबुलगा येथील वाहन चालक बालाजी नागोराव श्रीमंगले वय वर्षे 50 यांच्याविरुद्ध देगलूर पोलीस स्टेशन देगलूर येथे अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल झाला आहे. मा. न्यायालयात गुन्हा सिध्द झाल्यास संबंधितास आजीवन तुरुंगवास आणि 10 लाख रुपये पर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सुनिल जिंतूरकर व संतोष कनकावाड तसेच नमुना सहायक अमरसिंग राठोड यांनी पोलिस निरीक्षक बी.एम. धबडगे, पोलिस उपनिरीक्षक एम.एस. ठाकूर तसेच पो. कॉ. श्री. लुंगारे,श्री. यमलवाड यांचे सहकार्याने केली आहे.
00000

No comments:

Post a Comment

  ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ लोकशाही प्रक्रीयेत सहभागासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी करावी - विभागीय आयुक्त जितेंद्र...