Wednesday, March 11, 2020


जन्मशताब्दीनिमित्त डॉ. शंकरराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, राजाराम बापू पाटील,
ज्येष्ठ विचारवंत डॉ. रफीक झकेरिया यांचा विधानमंडळात गौरव
देशाच्या जडणघडणीमध्ये भूमिका बजावलेल्या व्यक्तींचा
इतिहास समजून घेतला पाहिजे
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सामान्य माणसाच्या कल्याणाची तळमळ असणाऱ्या व्यक्ती खासदार शरद पवार

मुंबई, दि. 11: देशाचे स्वातंत्र्य पुढे नेण्यामध्ये, महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या उभारणीमध्ये, जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मोठ्या व्यक्तींचा इतिहास सर्वांनीच समजून घेणे गरजेचे आहे. यासाठी राज्याच्या विधानमंडळाने हा इतिहास माहिती असलेल्या ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, पत्रकार आदी जाणकारांना आमंत्रित करुन विधानमंडळाच्या सदस्यांसाठी व्याख्यानाचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करावेत, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
            महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी केंद्रीय मंत्री डॉ. शंकरराव चव्हाण, राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी यशवंतराव मोहिते, लोकनेते राजाराम बापू पाटील आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. रफीक झकेरिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे संस्मरण करणारे व्याख्यान विधानमंडळाच्या वि. स. पागे प्रशिक्षण केंद्रामार्फत आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार शरद पवार होते.
           
विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी लोकसभा अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार तथा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
सामान्य माणसाच्या कल्याणाची तळमळ असणाऱ्या व्यक्ती शरद पवार
            विषयांचा सखोल अभ्यास करण्याची वृत्ती, सामान्य माणसाच्या कल्याणाची तळमळ, प्रशासनाचा चांगला अभ्यास ही डॉ. शंकरराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, राजाराम बापू पाटील आणि डॉ. रफीक झकेरिया यांची वैशिष्ट्ये होती, असे गौरवोद्गार काढून खासदार श्री. पवार यांनी या चारही जणांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, या सर्वांचा राज्याच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा सहभाग राहिला.
            श्री. पवार म्हणाले, डॉ. शंकरराव चव्हाण हे कडक शिस्तीचे आणि उत्तम प्रशासक होते. पाण्याच्या बाबतीत त्यांचा प्रचंड अभ्यास होता. पाण्यासंदर्भात काम केल्याशिवाय लोकांची परिस्थिती सुधारणार नाही ही त्यांची भूमिका होती. राज्यातील सर्व भागांचा विकास व्हावा या दृष्टीकोनातून वैधानिक विकास महामंडळाच्या निर्मितीमध्ये त्यांनी महत्वाचे काम केले. उजनी, जायकवाडी, विष्णुपुरी आदी अनेक धरणांच्या कामांची सुरुवात त्यांनी केली. प्राणहिता नदीच्या पाणीवाटपाबाबत आंध्र प्रदेशाबाबतच्या तंट्यामध्ये त्यांनी अत्यंत मुद्देसूद भूमिका मांडली.
           
यशवंतराव मोहिते यांच्याबद्दल श्री.पवार म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राचा ठराव पहिल्यांदा त्यांनी मांडला. 1952 मध्ये विधानसभेमध्ये त्यांनी कोयना धरण झाले पाहिजे हा ठराव मांडला. राज्याची वीजेची गरज आणि वीजनिर्मितीनंतर त्याचे पाणी शेतीसाठी मिळेल असे त्यांनी या ठरावाचे समर्थन केले. त्यांच्या दूरदृष्टीचे परिणाम आज पहायला मिळत आहेत.1960 ते 1978  या कालावधीत गृहनिर्माण, शेती, सहकार आदी विभाग सांभाळताना त्यामध्ये विशेष ठसा उमटवला. मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाची निर्मिती केल्यामुळे मुंबईत सर्वसामान्यांना घरे मिळावीत यासाठी अनेक चाळींची निर्मिती झाली. विदर्भ आणि खानदेशाच्या शेतकऱ्यांना मान मिळवून देणारी कापूस एकाधिकार योजना सुरू केली. तसेच उत्कृष्ट कारखाना उभारून चालविला.
            राजाराम बापू पाटील यांच्याविषयी खासदार श्री. पवार म्हणाले, लोकांमध्ये प्रत्यक्ष पदयात्रेद्वारे किंवा पायी जाऊन मिसळण्याची त्यांची भूमिका होती. याच तळमळीतून शेतकऱ्यांना जमिनीचे खातेपुस्तक देण्याचे काम त्यांच्या काळात झाले. कोल्हापूर, इस्लामपूरात औद्योगिक वसाहत, सहकारी संस्था उभ्या राहण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या काळात शिक्षणाची चळवळ उभी राहिली.
            नागरिकीकरणाबद्दल पुढील काळात जी नीती सरकारने अवलंबली त्याचे जनक डॉ. रफीक झकेरिया होते, असे सांगून श्री. पवार म्हणाले, औरंगाबादचे नागरिकीकरण, सुधारणा, औद्योगिकीकरण यात डॉ. झकेरिया यांचे संपूर्ण योगदान राहिले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले असून औरंगाबाद येथे शिक्षण संस्था सुरू केली.
            शिवराज पाटील यांनीही या महनीय व्यक्तींच्या आठवणी जागविल्या. त्यांनी डॉ. शंकरराव चव्हाण यांचे पाण्याच्या बाबतीतील काम, यशवंतराव मोहिते यांनी सुरू केलेली कापूस एकाधिकार योजना, डॉ. झकेरिया यांनी औरंगाबादच्या सुधारणेत तसेच औरंगाबाद विमानळाच्या उभारणीत दिलेल्या योगदानाची माहिती देऊन लोकसंख्या वाढीबाबत त्यांची चिंता तसेच त्याविरोधात घेतलेल्या भूमिकेचीही आठवण सांगितली.
            प्रास्ताविकात मंत्री श्री. अशोक चव्हाण यांनी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले डॉ. चव्हाण यांच्यावर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या विचारांचा फार मोठा पगडा होता. गरिबांच्या प्रश्नाला त्यांनी प्राधान्य दिले. स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी संघर्ष केला. सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी काम केले. रोखठोक भूमिका घेणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते असे सांगून श्री. चव्हाण यांनी राजाराम बापू पाटील, यशवंतराव मोहिते तसेच डॉ. झकेरिया यांच्याबाबतही गौरवोद्गार काढले.
            यावेळी मंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, श्री. फडणवीस यांनीही मनोगत व्यक्त केले. खासदार श्री. केतकर तसेच ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी या महान व्यक्तींच्या कार्याचा आढावा आपल्या व्याख्यानातून घेतला. कार्यक्रमात या चारही व्यक्तींच्या कार्याचा आढावा असलेल्या ‘संस्मरण पुष्पांजली’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी केले.
            कार्यक्रमास मंत्रीमंडळाचे सदस्य, विधानमंडळाच्या दोनही सभागृहाचे सदस्य तसेच निमंत्रित लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
००००
सचिन गाढवे/ वि.सं.अ./दि. 11.3.2020



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...