Tuesday, March 3, 2020


‘‘न्याय आपल्या दारी’’ संकल्पनेतून
 जिल्ह्यात फिरते लोकन्यायालय,
  कायदेविषयक शिबीराचे आयोजन
नांदेड दि. 3 :- समाजातील अगदी तळागाळातील लोकांना न्याय मिळावा हे उद्दीष्ट डोळयासमोर ठेवून सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या ‘‘न्याय आपल्या दारी’’ या संकल्पनेतून सुरू केलेल्या फिरते लोक न्यायालय व कायदेविषयक शिबीराचे आयोजन जिल्हयात 2 ते 23 मार्च 2020 या कालावधीत करण्यात आले आहे. जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येथे प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया यांच्या हस्ते    रविवार 2 मार्च 2020 रोजी फिरते लोक न्यायालय व कायदेविषयक शिबीर वाहनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश सौ. कमल वडगावकर, न्यायाधीश  आर. एस. रोटे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड व जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी उपस्थित होते. तसेच अभिवक्ता संघाचे अध्यक्ष मिलींद लाठकर, आशिष गोधमगावकर, जिल्हा सरकारी वकिल, फिरते लोक न्यायालय मोबाईल व्हॅनचे वाहन चालक के. एल. देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी, तसेच विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
            या कालावधीत हे वाहन नांदेड जिल्हयातील सर्व तालुक्यात नियोजीत गावात फिरून न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी प्रकरणे सदर लोक न्यायालयात तडजोडीने निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कायदेविषयक शिबीराद्वारे जनजागृती केली जाणार आहे. 
            या मोबाईल व्हॅनला प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया  व उपस्थित मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून लोहा तालुक्याकडे रवाना करताना त्यांनी फिरते लोक न्यायालयाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या व फिरते लोक न्यायालयात जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास न्यायाधीश आर. एस. रोटे यांनी व्यक्त केला. 
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...