Wednesday, February 12, 2020


"पंतप्रधान किसान" च्या लाभार्थ्यांना
पंधरा दिवसात पीक कर्ज – जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 12 :- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे (पी. एम. किसान) लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने नवीन पाऊल उचलले आहे. या लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत पीक कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना 15 दिवसांत पीक कर्ज मिळणार आहे. या मोहिमेत जिल्हयातील पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचे नियोजन असून यासाठी शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी घेतलेल्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
केंद्र सरकारच्या अर्थविषयक सेवा विभागाने याबाबतच्या सूचना बँकांना दिल्या असून बँकांकडून त्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
जिल्हयात पंतप्रधान किसान निधीचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीक कर्ज घेतलेले नाही त्या शेतकऱ्यांना सुलभरीत्या 15 दिवसांत पीक कर्ज देण्यासाठी मोहीम राबवण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेत शेतकऱ्यांना सुटसुटीत अर्ज करता यावा यासाठी आयबीए संस्थेने एक पानी अर्जाचा नमुना सर्व बँकांना उपलब्ध करून दिला आहे. या अर्जासोबत शेतकऱ्यांना सातबारा व शेतीचे उतारे तसेच पीक कर्ज नसल्याबाबतचे घोषणापत्र दिल्यानंतर 15 दिवसांत पीक कर्ज देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान निधी योजनेचा लाभ मिळत असलेल्या बँकेशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   218 आत्तापर्यंतचा सर्वात चांगला अर्थसंकल्प : अतुल सावे   डीपीसीचा निधी वाढवून मागणार पर्यटन व पर्यावरणाकडे लक्ष देणार  नांदे...