Tuesday, January 14, 2020


महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
गावस्तरावर शिबिराचे आज आयोजन
बँक कर्ज खाते आधार क्रमांकाशी संलग्न करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 14 :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती या योजनेची अंमलबजावणी संपूर्णत: आधार क्रमांक जोडलेल्या बँक खात्याशी संबंधित आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक कर्ज खाते आधार क्रमांकाशी संलग्न नाहीत अशा शेतकऱ्यांनी आज 15 जानेवारी 2020 या आयोजित केलेल्या कॅम्पमध्ये कॅम्प अधिकारी यांच्याकडे आपले आधार कार्डची छायाप्रतीवर आपला कर्ज खाते क्रमांक नमूद करून दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे   सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस  यांनी केले आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मागील काही वर्षात शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या चक्रात अडकलेला आहे आणि त्यांना शेती कामांकरिता नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी सन 2019-20 मध्ये अल्पमुदत पीक कर्ज वाटप अत्यंत असमाधानकारक आहे. ही वस्तुस्थिती विचारात घेता शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 घोषीत केली आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाद्वारे मार्गदर्शक कार्यपद्धती निर्गमित करण्यात आली आहे. या कार्यपद्धतीनुसार ज्या शेतकऱ्याचा आधार क्रमांक बँकेच्या कर्ज खात्याशी संलग्न नाही अशा शेतकऱ्याचा आधार क्रमांक बँकेच्या कर्ज खात्याशी दि. 14 जानेवारी 2020 पर्यत संलग्न करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने नांदेड जिल्ह्यात सदर कर्जमाफीस अंदाजे 1,79,624 शेतकरी पात्र असून त्यापैकी 1,30,115 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याशी आधार क्रमांक संलग्न आहे उर्वरित 49,506 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याशी आधार क्रमांक संलग्न नाही. अशा शेतकऱ्यांचे आधार क्रमांक कर्ज खात्याशी संलग्न करण्याचे काम अत्यंत जलदगतीने करणे आवश्यक आहे. याकरिता 14   15 जानेवारी 2020 यादिवशी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक यांच्या उपस्थितीत गावस्तरावर कॅम्प आयोजित करणेबाबत   जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आदेश दिले आहेत.
या कॅम्पमध्ये ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक कर्ज खात्याशी जोडलेले नाहीत अशा शेतकऱ्यांची यादी 7 जानेवारी 2020 रोजी बँकेने सूचना फलकावर प्रसिद्ध केलेली आहे. अशा शेतकऱ्यांचे आधार कार्डची स्वसाक्षांकित छायाप्रत घेऊन त्यावर त्या कर्जदाराचा कर्ज खाते क्रमांक उपलब्ध असल्यास, भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करून घेऊन अशा आधार कार्डाच्या छायाप्रती त्याच दिवशी संबंधित बँकेच्या शाखाधिकारी यांच्याकडे देणेबाबत कॅम्प अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत.
000000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...