Saturday, August 17, 2019


समाज प्रबोधनात माध्यमाचे महत्वाचे योगदान
 -  राज्यमंत्री अर्जून खोतकर
नांदेड, दि. 17 :- सामान्य नागरिकांचे प्रश्न शासनापर्यंत पोहचविण्यात व समाज प्रबोधानात माध्यमाचे महत्वाचे योगदान आहे, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी केले. 
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या 42 व्या राष्ट्रीय अधिवेशनाला आजपासून नांदेड येथील स्व. रामेश्वरजी बियाणीनगरी भक्ती लॉन्स मालेगाव रोड येथे सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. खोतकर बोलत होते. यावेळी रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार तथा इंग्रजी दै. द हिंदूच्या ग्रामीण विभागाचे माजी संपादक पी. साईनाथ यांच्या हस्ते राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, खा. हेमंत पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार, महापौर दिक्षा धबाले, आमदार राम पाटील-रातोळीकर, आमदार सुभाष साबणे, आमदार नागेश पाटील आष्टीकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख, झी-न्युज मुंबई कार्यकारी संपादक प्रसाद काथे, मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा आदि विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 
राज्य शासनाच्यावतीने अधिवेशनला शुभेच्छा देऊन राज्यमत्री श्री. खोतकर पुढे म्हणाले की, पत्रकारांची लेखनीत मोठे बळ असून ही शक्ती कमी होऊ देऊ नका. समाजातील प्रत्येक घटकांना माध्यमाप्रती आदराची भावना आहे ती केवळ आपल्या लेखनीतून निर्माण झाली आहे. लेखणीमुळे समाजातील प्रत्येक स्तरात पत्रकारांविषयी सन्मान निश्चितपणे पहायला मिळतो. सामान्य नागरिक प्रश्न पत्रकारांकडून सुटतील अशी अपेक्षा ठेवून असतो, ही जबाबदारी आपल्यावर आहे. विविध क्षेत्रात विषयाचे तज्ज्ञ म्हणून पत्रकारांकडून भुमिका मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो असाच कायम राहिला पाहिजे. त्यामुळेच लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिले जाते. त्यामुळे पत्रकारांनी विविध चळवळीत भाग घेतला पाहिजे. अधिवेशनात पत्रकारांच्या हक्काच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा व्हावी. राज्य शासन पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून अधिवेशात घेतलेले ठरावातील बाबींचा पाठपुरावा शासन स्तरावरुन केला जाईल, असे स्पष्ट करुन पत्रकारांचा आवाज समाजात ऐकला जातो, सामान्याचे सर्व प्रश्न शासनापर्यंत पोहचविले जातात. निश्चितपणे शासन हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. माध्यमांनी बातमी करतांना सर्व बाबींचा विचार करुन सत्यता पडताळून लिखाण करावे, असे आवाहन श्री. खोतकर यांनी शेवटी केले.
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार डी. पी. सांवत, माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सुर्यकांता पाटील, कार्यकारी संपादक प्रसाद काथे, माजी संपादक पी. साईनाथ यांनी मनोगत व्यक्त करुन राष्ट्रीय अधिवेशनासाठी शुभेच्छा दिल्या. 
या अधिवेशन कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय जोशी यांनी केले तर आभार प्रदिप नागापूरकर यांनी मानले. जिल्ह्यात तसेच विविध ठिकाणाहून राज्यातील पत्रकारांची यावेळी उपस्थिती होती.  
0000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...