Friday, June 21, 2019


राज्यस्तरीय योग शिबिरात नांदेडकरांनी
अनुभवला चैतन्याचा अखंड झरा... 
नांदेड दि. 21 :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय शिबिरात नांदेडकरांसहीत राज्यभरातून आलेल्या योगसाधक आणि नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदेवबाबांच्या योग सादरीकरणाचा चैतन्यदायी अखंड खळखळणारा झरा अनुभवला. यावेळी योगसाधकांमध्ये मोठा उत्साह आणि आनंद पहावयास मिळाला. या उत्साही वातावरणात सहभागी घेवून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान मिळाल्याचा आनंद नांदेडकरांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. 
नांदेड शहरातील शिवरत्न जिवाजी महाले चौक (मामा चौक) येथे राज्यस्तरीय योग दिनासाठी मागील दहा दिवसापासून राज्य शासनाच्या विविध आस्थापना आणि पतजंली योगपीठाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. याचा सकारात्मक परिणाम आज भल्या पहाटे दिसून आला. नांदेड शहरातील  शिबिराकडे जाणारे रस्ते वाहनांच्या व नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि योगगुरु रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी युवक-युवती , महिला -पुरुष, अबाल वृध्द , शिक्षकवर्ग , विद्यार्थी असे शहरी, ग्रामीण भागातील आणि सर्व जाती धर्मातील लोकांचा सहभाग जाणवत होता. कार्यक्रम स्थळाकडे शिस्तबध्दरितीने लाखोंच्या संख्येने जाणाऱ्या लोकांमध्ये उत्साह दिसून येत होता.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रशासकीय यंत्रणातील महसूल, पोलीस, शिक्षण, आरोग्य, महानगरपालिका, होमगार्ड, जिल्हा परिषद, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यासह विविध स्वंयसेवी संस्था व संघटना यांच्या स्वंयसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. कार्यक्रमस्थळी मुख्य व्यासपीठावर मान्यवरांच्या उपस्थितीत सुरु झालेल्या योग प्रात्यिक्षिकांना एका भव्यदिव्य सोहळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. पांढऱ्या शुभ्र पोषाखामधील लाखों नागरिक योगासनाचे विविध प्रकार करीत होते. प्रसार माध्यम आणि वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, गोल्डन वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी या आंतरराष्ट्रीय सोहळ्याचे निरीक्षण आणि वृत्तांकनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रत्येक क्षणाची नोंद घेत होते. विविध वृत्त वाहिन्यांद्वारे याचे थेट प्रसारण जगभरातील 177 देशातील नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी यांची सुरु असलेली लगबग जाणवत होती.
भारतीय परंपरेतील पाच हजार वर्षांपेक्षा जुन्या योग विद्येला आंतरराष्ट्रीय स्वरुप प्राप्त करुन देतांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघातून योगदिन हा जगभरात साजरा केला जावा. या मांडलेल्या प्रस्तावाला जगातून 177 देशांनी पाठींबा दिल्याने सुरु झालेला आंतरराष्ट्रीय योगदिनाचे सलग पाचवे वर्ष असल्याने राज्यस्तरीय शिबिराचा बहुमान नांदेड नगरीला प्राप्त झाल्याने हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवून आपल्या मनामध्ये साठवून ठेवण्यासाठी उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती उत्साही दिसत होता.
सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये विविध भागातील जातीधर्मातील लोकांच्या मनामध्ये योगाबद्दल असलेली आस्था त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियातून जाणली.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या पांगरा गावाच्या श्रीमती नंदाबाई कदम म्हणाल्या, शहरापासून दूर असूनही आमच्या खेडेगावात योगाबद्दल जनजागृती वाढत आहे. नियमितपणे योगासाने करणारी अनेकजण आहेत. त्यांना या भव्य योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा होती. परंतु सगळ्यांना येणे शक्य नसल्याने गावातील 50 महिला आणि पुरुषांचा चमू या कार्यक्रमासाठी आज येथे आलेला आहे . येथील कार्यक्रम पाहून आनंद झाला असून त्याची माहिती आम्ही गावातील इतरांना देणार आहोत.

नांदेडच्या नागार्जून नगर भागातील उर्दू प्राथमिक शाळेच्या शिक्षिका श्रीमती रिझवाना अंजूम यांनी सांगितले की, आम्ही योगदिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह सहभागी झालो आहोत. योगगुरु रामदेवबाबांना प्रत्यक्षात योगासने करुन दाखवतांना पाहता आले, ही कायम स्मरणात राहणारी घटना आहे.
        नांदेडच्या सचखंड विद्यालयातील  अनिल कौर रामगडीया आणि हरजिंदर कौर या शिक्षिका म्हणाल्या  की, आरोग्यपूर्ण जीवनासाठी योगा हा महत्वाचा असल्याचे जाणवल्याने आमच्या विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक नियमितपणे योगा करतात. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने आम्हाला यामध्ये सहभागी होता आले, याचा खुप आनंद वाटतो.
नांदेड येथील गुरुदत्त रिसर्च फाऊडेंशनचे फिजिओथेरेपी महाविद्यालयाचे डॉ. राहूल अशोक मैड यांनी सांगितले की, व्यायाम आणि योगासने आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग असून त्यामुळे आपणाला शारिरीक दुखण्यांपासून दूर राहण्याची आणि आनंदी जीवन जगण्याची संधी मिळते. यासाठी योगासनांबाबत जणजागृतीसाठी महाविद्यालयातील अध्यापक आणि विद्यार्थी योगदान देतात. तसेच त्याबद्दलची शास्त्रोक्त माहितीही देण्याचा नियमित प्रयत्न केला जातो. आजच्या योगदिनात सहभागी होण्यासाठीदेखील आम्ही लोकांना प्रेरित केले.
        
भंडारा जिल्ह्यातील सेंदुरवाफा गावातल्या योगप्रचारक प्रिती प्रकाश डोंगरवार यांनी सांगितले की, योगप्रचारक प्रकल्प, पतजंली योग समिती योगासनासाठी प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात जगभर कार्य करते आहे. शासनाने हा उपक्रम योगदिनाच्या माध्यमातून जगभरात नेवून याला मोठी मान्यता दिली आहे. यामुळे आमच्या उत्साहात भर पडली असून आजच्या योगदिनासाठी आमच्या भंडारा जिल्ह्यातून योग साधकांचे व प्रचारकांचे पथक पंधरा दिवसांपासून नांदेड येथे आलेले होते. मी स्वत: गृहीणी असून मला योगाचे महत्व पटल्याने इतरांना देखील ते सांगण्यासाठी मी हे काम करते आहे. आम्ही नांदेड शहर व ग्रामीण भागातील विविध ठिकाणी जावून लोकांना योगासनांबाबत तसेच आजच्या योगदिनाबद्दल माहिती दिली. वर्षभराच्या इतर कालावधीत योगशिबीर, आरोग्यसभा याद्वारे आम्ही लोकांमध्ये जनजागृती करीत आहोत.     
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केलेल्या प्रयत्नांचे फलीत या सोहळ्याच्या रुपाने संपन्न झाल्याने आयोजक, प्रशासन आणि स्वंयसेवक यातील प्रत्येकाला आनंद झाल्याचे दिसून आले.        
0000



No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...