Friday, June 21, 2019


योगाच्या माध्यमातून जीवन आरोग्यदायी बनवू या

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
§  नांदेडचा एकाचवेळी विक्रमी संख्येने योगा शिबीरात सहभागी होण्याचा जागतिक विक्रम
§  यापुर्वीचा विक्रम मोडीत काढत गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डकडून प्रमाणपत्र मिळविले.
§  2040-50 दरम्यान भारत सर्वात मोठे आध्यात्मिक व सामर्थ्यशली राष्ट्र होणार
§  योग दिनाच्या कार्यक्रमास सुमारे दीड ते दोन लाख लोकांची उपस्थिती
नांदेड दि 21:- प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगास अत्यंत महत्त्व असले पाहिजे. म्हणून योगाच्या माध्यमातून आपलं जीवन कायमस्वरुपी निरोगी व आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न करू या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
नांदेड येथे राज्य शासनाच्यावतीने तसेच विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी योगगुरु स्वामी रामदेवबाबा, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई चिखलीकर-देवरे, प्रविण पाटील चिखलीकर, औरंगाबाद विभागाचे आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, मनपा आयुक्त लहुराज माळी, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, आदींसह हजारो योग साधक उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संयुक्त राष्ट्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला व हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात सर्वात कमी कालावधीत मंजूर झाला. आज जगातील 150 पेक्षा अधिक देशात सुदृढ आरोग्यासाठी योगासने केली जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.  
जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमास महाराष्ट्रात येण्याची विनंती बाबाजींना केली असता, त्यांनी ती तातडीने मान्य केली. त्यांना आम्ही हा कार्यक्रम मराठवाड्यातील नांदेड येथे घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तेंव्हा त्यांना मोठा आनंद झाला होता. बाबाजी या राज्यस्तरीय शिबिरास उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे खूपखूप आभार , असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले . भारताची प्राचीन योग विद्या योगगुरु रामदेवबाबा यांनी संपूर्ण देशाबरोबरच ती जागतिक स्तरावरही पोहोचविली, याचा अभिमान असून आज नांदेडच्या पावनभूमीत प्रत्यक्ष रामदेवबाबा हे आपल्याला योग विद्याचे प्रशिक्षण देण्यासाठी आलेले आहेत. या संधीचा लाभ घेऊन नांदेड जिल्हा वासियांनी निरोगी व आरोग्यदायी जीवनासाठी नियमीत योगासने करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
भारत देश हा प्राचीन योग विद्येच्या माध्यमातून अध्यात्म महाशक्तीकडे वाटचाल करत आहे. तसेच या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, राजनैतीकदृष्ट्या भारत अधिक सुरक्षित होत असल्याचे रामदेवबाबा यांनी सांगून सन 2040 ते 2050 दरम्यान भारत विश्वातील सर्वात मोठे सामर्थ्यशाली राष्ट्र होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नियमित योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. तसेच शरीर व मन निरोगी राहिल्याने जीवनमानातही वाढ होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात नियमित योगासने करुन आपले जीवन आरोग्यदायी व सुखकर बनविण्याचे आवाहन रामदेवबाबा यांनी केले.
आजच्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून येथे जमलेल्या प्रत्येक नागरिकांने योगधर्म, मानवधर्म, राष्ट्रधर्म व सेवाधर्माचा प्रामाणिकपणे अंगीकार करण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
योगा शिबिराची गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
एकाचवेळी एकाच ठिकाणी 91 हजार 323 लोकांनी योगासने करण्याचा पूर्वीचा जागतिक विक्रम नांदेड येथील आजच्या राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय योग दिनादिवशी मोडला जाऊन नांदेडच्या पावनभूमीत एक लाख 10 हजारापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी एकाच ठिकाणी रामदेवबाबा यांनी योग विद्येचे प्रशिक्षण दिले व नवीन जागतिक विक्रमाला नांदेडकरांनी गवसणी घातली.
यावेळी गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी मनीष विष्णूई यांनी ड्रोनद्वारे प्राथमिक गणनेनुसार नांदेड येथील योग कार्यक्रमास एक लाख 10 हजारापेक्षा अधिक लोक असल्याची माहिती दिली. जागतिक विक्रम नांदेडकरांनी प्रस्थापित केल्याचे गोल्डन बुक प्रमाणपत्र श्री. विष्णुई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रामदेवबाबा यांना यावेळी दिले. आयुष विभागाने तयार केलेल्या पवनी या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रामदेवबाबा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. पतंजलीच्यावतीने स्वदेशी समृद्धी कार्ड अंतर्गत पतंजली कार्यकर्त्यांना मदत देण्यात येत असते. नांदेड येथील पतंजली कार्यकर्त्याचा अपघात होऊन जायबंदी झाल्याने त्या कार्यकर्त्यांला पाच लाखाचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला.
मेरा जीवन-मेरा मिशन
रामदेवबाबा यांच्या जीवनावर आधारित मेरा जीवन, मेरा मिशन या आत्मचरित्राच्या मुखपृष्ठाचे विमोचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या आत्मचरित्राच्या पुस्तकांची प्रकाशनापूर्वीची विक्रीची नोंदणी आजपासून सुरु झाली. यावेळी श्री फडणवीस यांनी या आत्मचरित्राच्या 100 पुस्तकांची आगाऊ मागणी नोंदविली असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रामदेवबाबा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी रामदेवबाबा यांनी व्यासपीठासह सर्व योग साधकांना शरीराला ऊर्जा प्राप्त करुन देणाऱ्या योगींग-जॉगींग आसनाने सुरुवात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही योगासनांचे विविध प्रकार केले. यावेळी सकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत रामदेवबाबा यांनी सूर्यनमस्कार, ताडआसन, त्रिकोण आसन, वृक्षासन, गरुडासन आदि अनेकविध आसनांचे शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक, नागरिक, महिला, शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. जयदीप आर्या यांनी केले. या कार्यक्रमास सुमारे दीड ते दोन लाख नागरिकांची उपस्थित होती.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...