Friday, February 15, 2019


राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या उमेदवारांना सुचना
नांदेड दि. 15 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा (पूर्व) परीक्षा- 2019 ही रविवार 17 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत तसेच दुपारी 3 ते सायं 5 वाजेपर्यंत या कालावधीत (दोन सत्रात) नांदेड जिल्हा केंद्रावर 50 शाळा महाविद्यालयात घेण्यात येणार आहे. आयोगामार्फत दिलेल्या सूचनांचे उमेदवारांनी पालन करावे , असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
उमेदवारांनी परीक्षेला येतांना प्रवेशपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधारकार्ड निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट व स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान एक मूळ ओळखपत्र व मुळ ओळखपत्राची छायाप्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
उमेदवारांनी परीक्षा कक्षात भ्रमणध्वनी, स्मार्ट वॉच, डिजीटल वॉच, मायक्रोफोन, कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, परिगणक, ब्ल्युटूथ इत्यादी इलेक्ट्रॉनिक साहित्याचा वापर करण्यास सक्त मनाई आहे.
परीक्षेत मास-कॉपी / गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांवर तसेच संगनमताने पेपर सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याच्या आयोगाच्या सूचना आहेत.
परीक्षा उपकेंद्रावर उमेदवारांची पोलीस कर्मचारी यांचेकडून तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीसाठी उपकेंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्यापूर्वी किमान दिड तास अगोदर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून आयोगमार्फत प्रत्येक परीक्षा केंद्रावर हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहे.
आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून परिक्षा केंद्र परिसरात पोलीस बंदोबस्त व कलम 144 प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या सूचनांचे उमेदवारांनी पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
000000

No comments:

Post a Comment