Saturday, December 8, 2018


ग्रंथोत्सवामुळे वाचन संस्कृतीची जोपासणा व्हावी
- जिल्हाधिकारी डोंगरे 
"नांदेड ग्रंथोत्सव-2018" चे उद्घाटन उत्साहात संपन्न

 नांदेड, दि. 8 :- पुस्तक वाचनातून वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. यातून समाज सुसंस्कृत होत जातो, यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम महत्वाचे ठरतात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय नांदेड यांच्यावतीने आयोजित  नांदेड ग्रंथोत्सव 2018 चे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष माजी आमदार ॲड.  गंगाधर पटणे हे होते. तर विभागीय सहनिबंधक तथा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक श्रीकांत देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर,  औरंगाबादचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, उच्च  शिक्षण विभागाचे वरिष्ठ लेखाधिकारी निळकंठ पांचगे, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशिष ढोक, सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे, माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख, ग्रंथालय चळवळीचे बी.जी. देशमुख, प्रकाशक निर्मलकुमार सुर्यवंशी, राजेंद्र हंबिरे, विठ्ठल कावे आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले नांदेड ग्रंथोत्सवात विविध दालनात नवनवीन पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या दालनाला भेट देवून ग्रंथांची खरेदी करुन ती वाचली पाहिजेत. नवीन पिढीचे समाज माध्यमांवरील वाचन वाढले आहे, अशावेळी पुस्तक वाचनाला विसरुन चालणार नाही. वाचनातून सुंदर जीवन घडण्यास मदत होते. वाचनातील आकलन करुन ते कृतीत विचार आले पाहिजे, असे सांगून त्यांनी उज्ज्वल नांदेड या उपक्रमात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पुस्तक वाचनातून स्पर्धा परिक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडले आहे. त्यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तके देवून त्यांना उज्ज्वल जीवनाकडे नेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. डोंगरे यांनी केले.
श्री पटणे म्हणाले अवांतर वाचनाची आवड लहान वयातून झाली तर कोणत्याही क्षेत्रात त्यांना सहज यश मिळते. नांदेड ग्रंथोत्सवात विविध दालनात उपयुक्त ग्रंथ उपलब्ध आहेत. ती खरेदी करुन वाचली पाहिजे असे आवाहन करतांना नांदेड महानगरपालिकेने त्यांच्या राम मनोहर लोहिया सार्वजनिक वाचनालयाची नवीन इमारत वाचकांसाठी लवकरात-लवकर उभी करावी, अशी मागणी केली.
विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख म्हणाले, ग्रंथ वाचनातून विचार करण्याची क्षमता वाढते. अनेक समाज सुधारकांनी ज्ञानातून समाज घडविला. आधुनिक भारत ज्ञानातून घडत आहे. अनावश्यक खर्च टाळून पुस्तक खरेदी करावीत. घराचा स्वर्ग करायचे असेल, तर त्याठिकाणी पुस्तक असले पाहिजे ती वाचली पाहिजेत. यातून सर्वांगीण विकासाचा विचार निर्माण होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
सहाय्यक ग्रंथालय संचालक श्री. हुसे यांनी नांदेड ग्रंथोत्सव हा नेहमीच राज्यात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. जिल्ह्यातील ग्रंथालयांनी येथील दालनातून उपयुक्त ग्रंथांची खरेदी करुन आपले ग्रंथालये विविध ग्रंथांनी परिपूर्ण ठेवावीत, असे आवाहन केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशिष ढोक यांनी प्रस्ताविकात नांदेड ग्रंथोत्सव आयोजनामागची भुमिका मांडली. वाचन संस्कृती वाढावी त्यांना नवीन ग्रंथ मिळावे यासाठी हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. ग्रामीण भागात ग्रंथचळवळीचे चांगले काम होत आहे. शासनाने पुस्तकाचे गाव म्हणून सातारा जिल्ह्यातील भिल्लार गावाची निवड केली आहे, तशी गावे नांदेड येथे झाली पाहिजेत. नांदेड ग्रंथोत्सवात आयोजित विविध कार्यक्रमाचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
महात्मा गांधी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन चरित्रावरील चित्र प्रदर्शनाचे आयोजन याठिकाणी करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी चित्र प्रदर्शन व ग्रंथ दालनाला भेट देवून पाहणी केली. प्रास्ताविक देवदत्त साने यांनी केले तर आभार प्रताप सुर्यवंशी यांनी मानले.
नांदेड ग्रंथोत्सवात रविवार 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. परिसंवाद आणि दुपारी 2 वा. वक्तृत्व स्पर्धा आणि  4 वा. समारोप कार्यक्रम व बक्षिस वितरण होणार आहेत. ग्रंथ प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत सुरु राहणार आहे, नागरिकांनी या कार्यक्रमाचा व ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...