Wednesday, September 26, 2018


मतदारांच्‍यादृष्‍टीने  बीएलओ  हा महत्‍वाचा घटक
अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील ; लोहयात कार्यशाळा 
नांदेड दि. 26 :- मतदारांच्‍यादृष्‍टीने बीएलओ हा महत्‍वाचा घटक असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्‍यासाठी मतदार यादी अचूक असणे महत्‍वाचे आहे. यासाठी बीएलओ यांनी मतदार नोंदणी व यादीचे काम अचूक करावे. भारतीय नागरीकास मतदानाचा हक्‍क बजावता यावा यासाठी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
      मतदार यादीचे विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत लोहा येथील व्‍यंकटेश गार्डन मंगल कार्यालय येथे लोहा-कंधार विधानसभा अंतर्गत नियुक्‍त बीएलओ यांची 25 सप्‍टेबर 2018 रोजी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्‍यात आली. सदर कार्यशाळेस अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील यांनी मार्गदर्शन केले, त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी लोहयाचे तहसिलदार विठल परळीकर, कंधारच्‍या तहसिलदार संतोषी देवकुळे, गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड, नायब तहसिलदार एस एम देवराये, सारंग चव्‍हाण यांचेसह बीएलओ मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
      पुढे बोलताना अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील म्‍हणाले की, मतदार नोंदणी अधिनियम अंतर्गत मतदार यादी तयार करण्‍याचे काम केले जाते. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर वयाची 18 वर्ष पूर्ण होणा-या पात्र नविन मतदाराचे नाव मतदार यादीत समावेश करावा. मतदार यादी अचूक होण्‍यासाठी मतदार यादी पुनरिक्षणाचे काम वारंवार करण्‍यात येते. निवडणूक प्रक्रिया पारदर्शी होण्‍यासाठी अचूक मतदार यादी असणे आवश्‍यक आहे. याची बीएलओ यांच्‍यावर जबाबदारी असल्‍याने मतदारांच्‍या दृष्‍टीने बीएलओ हा महत्‍वाचा घटक आहे. त्‍यामुळे निकषानुसार विहीत नमुण्‍यातील फॉर्म तपासून अचूक काम करावे व एकही तक्रार येवू देवू नये. लोकप्रतिनिधींची नावे मतदार यादीत असल्‍याची खात्री करावी. मतदारांची नावे वगळताना घरोघरी भेटी देवून तपासणी करावी.  मतदारांना मतदानाचा हक्‍क हिरावला जावू नये, याबाबतची दक्षता घ्‍यावी. मतदार यादीत दोन ठिकाणी नावे असने ही फसवणूक असल्‍याने मतदारांनी याची काळजी घ्‍यावी. कार्यक्रमाचे प्रास्‍तविक तहसिलदार विठठल परळीकर यांनी केले. सूत्रसंचालन विक्रम कदम यांनी तर आभार नायब तहसिलदार सारंग चव्‍हाण यांनी मानले.
      सदर कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी निवडणुक विभागाचे अव्‍वल कारकुन पी.पी. बडवणे , प्रशांत आपशेटे , तिरुपती मुंगरे, सुर्यकांत पांचाळ, विसपुते , सतीश धोंडगे , राजेश भदरगे, आर जी जहागीरदार, तलाठी कदम , माधव काकडे , सोपान परडे, राजु हनवते , सुधाकर महाबळे , चव्‍हाण , भुजंग वाघमारे, सुरेश पांचाळ आदींनी योगदान दिले.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...