Wednesday, September 26, 2018

राष्ट्रीय पोषण महिना विशेष लेख क्र. 3 :



दि. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2018 या कालावधीत देशभर राष्ट्रीय पोषण महिनासाजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोहीम राबविण्यात येत असून पोषणाचे महत्व लोकांना पटवून देण्यात येत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आपल्या आहारात फळांचे महत्व सांगणारा लेख ...
आहारात फळांचे महत्व
आहारात विविध प्रकारच्या फळांच्या समावेशाला अनन्यसाधारण महत्व आहे. फळांमध्ये 90 ते 95 टक्के शुद्ध पाणी असते. त्याने रक्ताचे शुद्धीकरण होते. शरीराची अंतर्गत स्वच्छता करण्याचे महत्वपूर्ण कार्य फळातील पाणी करू शकते. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात 'तंतुमय' म्हणजे चोथायुक्त पदार्थ असतात. तंतुमय पदार्थांनी आतड्यांच्या स्नायूंचे आकुंचन - प्रसरण चांगले झाल्याने मलप्रवृत्ती चांगली होऊन मलविसर्जन क्रिया सुलभ, सुकर होते. शौचास साफ होते. त्यायोगे अपचन होत नाही किंवा अपचनाने पोटात दुखणे, बद्धकोष्ठता, मलावरोध, आतड्यांना व्रण निर्माण होणे इत्यादी विकार जडत नाहीत.     
आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी आणि अन्य काही फळात '' जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते. सर्दी कमी करण्यास '' जीवनसत्व उपयुक्त ठरते. '' जीवनसत्वामुळे 'स्कर्व्हो' सारखा रोग होत नाही.
फळात जीवनसत्वे, आम्ले आणि संप्लवनशील तेले (व्होलाटाईल ऑईल्स) असतात. संप्लवनशील तेलामुळे भूक चांगली लागण्यास मदत होते. आंबा, कलिंगड, चेरी आणि अन्य काही फळात 'बीटा कॅरॉटीन' नावाचे द्रव्य असते. आरोग्य तज्ञांच्या मतानुसार या द्रव्यामुळे कर्करोगापासून बचाव होऊ शकतो. फळात 10 ते 15 टक्के मिनरल्स म्हणजेच खजिनद्रव्ये म्हणजेच धातू, अधातू, क्षार असतात. या खजिनद्रव्यात सोडीयम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, गंधक, फॉस्फरस, लोह, तांबे या धातू मूलद्रव्याचा समावेश होतो. कॅल्शियममुळे हाडांना बळकटी येते. दातांचे आरोग्य चांगले राहते. रक्तात योग्य प्रमाणात कॅल्शियम नसल्यास माणसे चिडक्या स्वभावाची बनतात. मॅग्नेशियम मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यास उपयुक्त ठरते. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास व्यक्तीचा उत्साह मंदावतो. माणसास थकवा जाणवतो. रक्तातील सोडियम अन्नपचनाला मदत करते. पोटॅशियममुळे जखमांच्या वेळी रक्त थिजण्याच्या (क्लॉटिंग) क्रियेला मदत होते. थिजण्याच्या सक्षम क्रियेमुळे रक्तस्त्राव जास्त होत नाही. पोटॅशियम यकृताला उत्तेजीत करते. आयोडीनमुळे कंठस्थ ग्रंथीचे आरोग्य चांगले राहते. त्यायोगे थायरॉईड ग्रंथीच्या संबंधित विकार जडू शकत नाहीत. सर्वसमावेषक संतुलीत आहारामध्ये सर्व प्रकारच्या फळांचा, मोसमी किंवा बिगरमोसमी, त्याचबरोबर बदाम, पिस्ते, काजू, अक्रोड, चारोळी, इ. ड्रायफ्रुटसचा समावेश असणे आगत्याचे आहे.
विविध फळांमध्ये केळी, डाळिंब, अंजीर, करवंदे, जांभूळ, चिकू, सीताफळ, रामफळ, संत्री, मोसंबी, द्राक्षे, फणस, बोरे, अननस इत्यादी अनेक प्रकारची फळे समाविष्ट होतात. ज्या आहारात फळांचा समावेश अधिक त्या आहाराला संरक्षक आहार म्हणून संबोधले जाते.
महागडा आहार म्हणजे 'सत्वयुक्त' आहार किंवा सफरचंदसारख्या महागड्या फळांचे सेवन म्हणजेच अधिक सत्वयुक्त आहार हा आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात खोलवर रुजलेला एक गैरसमज आहे. खरे पाहता सफरचंद, बदाम, आक्रोड हे फळांचे प्रकार सकृतदर्शनी महागडे वाटत असले तरी त्यांच्यातील पोषण मूल्यांचा विचार केला आणि त्यांच्यातील रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याच्या शक्तीचा विचार केल्यास ती खऱ्या अर्थाने महागडी नाहीत. दुसरा मुद्दा हा की केळी, पेरू, पपई, चिकू, बोरे, संत्री, मोसंबी, सीताफळ, करवंदे, जांभळे ही उच्च दर्जाची पोषणमुल्ये असणारी, अत्यंत स्वस्त अशी फळे आहेत. नित्यनियमाने त्यांचे सेवन करण्यास काय हरकत आहे ?
            नारळ :- कफ, वात, पित्त प्रकृतीच्या व्यक्तीसाठी नारळ व नारळपाणी हे वरदानच आहे. नारळातील खोबरे आणि नारळ पाणी या दोहोत प्रथिने आहेत, कार्बोहाड्रेट्स आहेत. तेलाच्या स्वरूपात स्निग्धांश आहे, क्षार आहेत, जीवनसत्वे आहेत, अनेक प्रकारची खनिजद्रव्ये आहेत. आजारपणात डॉक्टर नारळपाणी पिण्याचा सल्ला देतात. नारळ म्हणजे सर्व प्रकारच्या पोषकद्रव्यांनी परिपूर्ण असा समतोल आहार आहे.
सफरचंद :- सफरचंद संधिवातावर उत्तम आहे. सफरचंद सेवनाने डोकेदुखी कमी होते. नैराश्य आले असल्यास तेही कमी होते. सफरचंद शरीराची ताकद व रोगप्रतीकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरते. सफरचंदामुळे शौचाच्या तक्रारी कमी होतात व पचनशक्ती सुधारते.
द्राक्षे :- आयुर्वेदात द्राक्ष फळाला उच्च स्थान आहे. पिकलेली द्राक्षे चवीला मधुर असतात. ती तहान भागवू शकतात. द्राक्षांमुळे पित्तदोष कमी होतो. द्राक्षे खाल्यानी थकवा कमी होतो. एक महत्वाचा सल्ला हा की द्राक्षावर कीटकनाशकांचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे द्राक्षे ही दोन - तीन वेळा स्वच्छ धुवून खावीत हे अधिक महत्वाचे. 
केळी :- केळी सर्व ऋतूत उपलब्ध होतात. केळ्यामध्ये ७० टक्के पाणी, ०.८ टक्के खनिज द्रव्ये, ०.४ टक्के तंतुमय पदार्थ, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात. केळात कॅल्शियम, लोह, फॉस्फरस असतात. कॅल्शियममुळे हाडे व स्नायू मजबूत होण्यास मदत होते. केळातील साखर पचनास सुलभ असल्याने थकलेल्या शरीराला चटकन शक्ती प्राप्त होऊन उत्साह वाढतो. पचनसंस्थेचे आरोग्य टिकविण्यासाठी, मलविसर्जनची क्रिया सुलभ होण्यासाठी केळी फारच मोलाची ठरतात. केळी शक्तिवर्धक असल्यामुळे बालकांना शक्ती वाढविण्यासाठी ती टॉनिकच्या स्वरूपात उपयोगी पडतात. अधिक वाढलेले पित्त केळाने कमी होते. मलावरोध, आतड्याची जळजळ, मूळव्याध, डायरीया, संधिवात इ. अनेक रोगांवर केळ्याचा आहार फायद्याचा ठरतो. केळात लोह असते.
डाळींब :- डाळिंबात ग्लुकोजसारखी चटकन पचणारी साखर असते. डाळिंब दाण्यातील रस रक्तवर्धक असून त्याचा लॅक्टींग एजंट म्हणून म्हणजेच मातेला दूध वाढविण्यासाठी उपयोग होतो. डाळींबाच्या सेवनाने हगवण आमांश, मुळव्याध, जठर विकार बरे होतात. डाळिंब सालीचा रसही औषधी गुणधर्माचा असून त्याचा जंतूनाशक म्हणून आणि त्वचारोगावर चांगला उपयोग होतो. डाळिंब जठराग्नी प्रदिप्त करते. त्यामुळे भूक चांगली लागते. डाळिंब पित्तनाशक असल्यामुळे पित्ताच्या तक्रारीवर उत्तम ठरते. डाळिंबाने वातदोषाचे शमन होते. हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. डाळिंबाने मलप्रवृत्ती सुधारून शौचास साफ होण्यास मदत होते.
पपई :- पपई हे शरीराची ताकद वाढविणारे फळ आहे. पपई मूळव्याधीवर गुणकारी सिद्ध झाली आहे. मूत्रपिंडाचे विकार कमी करण्यासाठी पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. पपईच्या रसामुळे आम्लपित्त कमी होते. जठराला आलेली सूज कमी होते. पपईच्या सेवनाने अन्नपचन सुलभ होते. पपईने मांसाहाराच्या पचनास सुलभता प्राप्त होते. पपईच्या बियांचे चूर्ण व मध यांचे मिश्रण जंतुनाशक आणि कृमिनाशक म्हणून उपयोगी पडते.
अन्य फळे:- पेरू कफवर्धक परंतु मलप्रवृत्ती साफ करण्यास उपयुक्त. अंजीर पित्तशामक असून रक्तातील हिमोग्लोबिन वाढविण्यास मदत करते. आंबा वीर्यवर्धक असून शक्ती वाढविण्यास उपयुक्त आहे. लिंबे, संत्री, मोसंबी या फळात '' जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते. '' जीवनसत्व अन्नपचन कार्यास प्रभावी ठरते. व्यायाम केल्यानंतर घाम येतो व शरीराचे निर्जलीकरण होते. या फळांनी म्हणजेच त्यांच्या रसांनी शरीरातील कमी झालेल्या जलाशयाची भरपाई होऊन शरीरातील 'जलसंतुलन' कायम राखले जाते. बदाम प्रथिनयुक्त असून बुद्धिवर्धक आहे. बदामामुळे अतिरिक्त कोलेस्टेरॉल कमी होऊ शकते.
जांभूळ कफ व पित्तनाशक आहे. हे फळ विशेष करून मधुमेही व्यक्तिंना अधिक पथ्यकारक आहे. कलिंगड उन्हाळ्यातील मोसमी फळ आहे. कलिंगड, टरबूज, खरबूज, काकडी ही उन्हाळ्यात उत्पादीत होणारी फळे आहेत. निसर्ग कल्पक आहे. उन्हाळ्यात उन्हामुळे आणि अधिक उष्णतेमुळे प्राणीमात्राच्या शरीरातील घामाच्या स्वरूपात मोठा जलक्षय होतो. या फळात पाण्याचे प्रमाण मोठे असल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्याचे काम ही फळे करतात. या फळातील पाणी शुद्ध असून रक्त शुद्धीकरणाचे काम ती चांगल्या प्रकारे करतात. या फळातील साखर लवकर सहजरित्या पचणारी असल्यामुळे त्यांचा चांगला उपयोग होतो. कफ प्रकृतीच्या आणि ज्यांना वारंवार सर्दी, पडसे, खोकला होतो, त्यांनी शक्यतो ही फळी खाऊ नयेत.
फळे हि मानवी जीवनाला लाभलेले 'वरदान' आहे. 'फलाहार' हा उत्तम आहार आहे. निसर्ग फळांच्या माध्यमातून मानवी आरोग्याचे रक्षण करतो. फलाहाराकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आपल्या आहारात योग्य ते बदल घडविण्याची जिद्द आपण सर्वानी का बरे बाळगू नये?
-प्रा. वसंतराव बंडोबा काळे
  सेवानिवृत्त उपप्राचार्य
  जयसिंगपूर, जि. कोल्हापूर
००००

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...