Wednesday, July 4, 2018


पोलीस, सैन्यदल भरती पुर्व प्रशिक्षणासाठी शिबीर
नांदेड दि. 4 :- अनुसूचित जाती व नवबौध्द  घटकातील युवक व युवतींसाठी अमरावती येथे आयोजित सैन्य व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणासाठी सोमवार 16 जुलै 2018 रोजी नांदेड जिल्हयातील उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड येथे उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी  केले आहे.
            सामाजिक न्याय व सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक व युवतींसाठी सैन्य व पोलीसमध्ये भरती करण्याकरिता भरतीपुर्व प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर केला आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 3 महिन्याचा असून प्रशिक्षण श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे होणार आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवकांसाठी सैन्य व पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षणासाठी पात्र अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवार हा महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. उमेदवाराचे वय हे 18 ते 25 वयोगटातील असावे. उमेदवाराची पुरुष उंची 165 से.मी व महिला उंची 155 से.मी. छाती न फुगवता पुरुष 79 से.मी. (फुगवुन 84 से.मी. ) असावी. शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी पास. जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालयातील नोंदणी आणि ओळखपत्राची सत्यप्रत देणे आवश्यक राहील. उमेदवार हा शारीरीक व मानसिक दृष्टया निरोगी असावा.
            प्रशिक्षणाच्या निवडीसाठी नांदेड जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक, युवतीनी सोमवार 16 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अर्धापूर रोड, ग्यानमाता शाळेच्या समोर, नमस्कार चौक, नांदेड येथे मुळ कागदपत्रासह व साक्षांकित प्रतीसह उपस्थित राहावे. उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना जाण्या-येण्याचा भत्ता दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असेही आवाहन नांदेडचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 1136 जिल्हास्तरीय   युवा महोत्सवाच्या तारखेत बदल युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024 नांदेड दि.   25   नोव्हेंबर  :-   ज...