Friday, July 13, 2018


नोंदणी विवाहासाठी
ऑनलाईन नोटीस बंधनकारक
1 ऑगस्ट पासून अंमलबजावणी
नांदेड, दि. 13 :- विशेष विवाह कायदा 1954 नुसार नोंदणी विवाह करणाऱ्या वर-वधू यांना बुधवार 1 ऑगस्ट 2018 पासून विवाहाची नोटीस, वय व रहिवास या पुराव्याच्या कागदपत्रांसह ऑनलाईन देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. विवाह अधिकारी कार्यालयात आल्यानंतर डेटा एन्ट्री करण्यामध्ये पक्षकारांचा वेळ जाऊ नये व त्यामध्ये चुका होऊ नयेत याकरिता नागरिकांना त्यांची डाटा एंट्री करण्याची सुविधा विभागाने http://www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे, अशी माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी एच. एस. उजगिरे यांनी दिली आहे.  
विशेष विवाह कायदा 1954 नुसार विवाह संपन्न करण्यासाठी विवाह इच्छूक वर-वधू यांनी आपल्या नियोजित विवाहाची नोटीस, वय व रहिवास यासाठीच्या पुराव्याच्या कागदपत्रांसह संबधित जिल्ह्याचे विवाह अधिकारी यांना सादर करावी लागते आणि नोटीस फी भरावी लागते.
सदर वर-वधू संबंधित अटींची पूर्तता करीत असल्यास विवाह अधिकारी सदर नोटीस स्वीकारतात व त्याची प्रत नोटीस बोर्डावर लावतात. तसेच वर किंवा वधू या दोघांपैकी एकजण अन्य जिल्ह्यातील असल्यास या नोटीसीची एक प्रत त्या जिल्ह्याच्या विवाह अधिकाऱ्यांकडे नोटीस बोर्डवर लावण्यासाठी पाठविली जाते.
विवाह अधिकारी यांचेकडे नोटीस दिल्यानंतर तीस दिवसाच्या आत नियोजित विवाहबद्दल आक्षेप न आल्यास त्यानंतरच्या 60 दिवसात वर-वधू 3 साक्षीदारांसमक्ष विवाह अधिकाऱ्यासमोर हजर राहतात व विवाह अधिकारी त्यांचा विवाह संपन्न करुन विवाह प्रमाणपत्र देतात.
प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयातील एका दुय्यम निबंधकास त्या जिल्ह्यासाठी विवाह अधिकारी घोषित करण्यात आलेले आहे. मुंबई, मुंबई उपनगर  व पुणे या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विवाह अधिकारी आहेत.
विभागाने दस्त नोंदणी प्रमाणेच विशेष विवाह नोंदणी प्रक्रियेचे देखील संगणकीकरण केले आहे. त्यासाठी राज्यातील सर्व विवाह अधिकाऱ्यांची कार्यालये मध्यवर्ती सर्व्हरवर जोडण्यात आलेली आहेत.
विशेष विवाह नोंदणीकरीता वर व वधू यांना विवाह अधिकाऱ्यांकडे नोटीस देणे व तीस दिवसानंतर विवाह संपन्न करणे अशा दोन कामासाठी जावे लागते. यापैकी नोटीस देण्याची संपूर्ण प्रक्रिया नियोजित वर किंवा वधू यांना विवाह अधिकारी कार्यालयात न जाता कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाईन पूर्ण करता येईल अशी व्यवस्था दिनांक 1 नोव्हेंबर 2017 पासून कार्यान्वित करण्यात आलेली आहे. यासाठीची लिंक देखील विभागाच्या http://www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या व्यवस्थेचा / सुविधेचा अधिकाधिक वापर करण्याच्यादृष्टिने संबंधीत विवाह निबंधक कार्यालयांमध्ये सूचना फलक लावण्यात आले आहेत.
ऑनलाईन नोटीसच्या जनजागरणाचा भाग म्हणून पुणे येथील विवाह निबंधक कार्यालयाच्या परिसरात विभागाने नागरिकांकरिता ऑनलाईन नोटीस सुविधेच्या वापरासाठी स्वतंत्र संगणक व इतर साहित्य मार्गदर्शक ऑपरेटरसह मोफत उपलब्ध ठेवले आहे. तसेच 1 ऑगस्ट 2018 पासून विशेष विवाहासाठीची नोटीस ऑनलाईन देणे बंधनकारक करण्यात येत आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  
0000000

No comments:

Post a Comment

​ वृत्त क्र.   1232 ​ स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतमध्ये आज सनद वाटप  प्रधानमंत्री आभासी पद्धतीने लाभार्थ्याशी संवाद स...