Friday, July 13, 2018


जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते
शेडनेट मधील भाजीपाला रोपावाटीकेचे उद्घाटन
संस्कृति संवर्धन मंडळातील विविध उपक्रमांची पाहणी
नांदेड दि. 13 :- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सगरोळी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील नुकत्याच उभारण्यात आलेल्या शेडनेट वरील भाजीपाला रोपवाटीकेचे उद्घाटन केले. यावेळी डोंगरे यांनी संस्थेतील विविध उपक्रमाची पाहणी करून वृक्षारोपण केले.  
कृषी विज्ञान केंद्राने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय बागवानी मिशन अंतर्गत शेडनेटची उभारणी केली आहे. या शेडनेट मध्ये केंद्रामार्फत विविध भाजीपाला रोपांची निर्मिती करण्यात येणार असून ही रोपे शेतकऱ्यांना मागणीप्रमाने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वातावरणातील बदलामुळे होणारे शेतीतील आर्थिक  नुकसान टाळण्यासाठी शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळत आहेत. यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे. कृषी विज्ञान केंद्राकडे दरवर्षी शेतकऱ्यांची भाजीपाला रोपांची मागणी वाढत असून शेतकऱ्यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी दहा गुंठे क्षेत्रावर शेडनेटची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये विविध भाजीपाल्यांच्या एकाचवेळी साधारण दीड ते दोनलाख रोपांची निर्मिती होणार असून  या उपक्रमातून निरोगी व सदृढ भाजीपाला  रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत. शेतकऱ्यांनी भाजीपाला रोपांची मागणी केंद्राकडे नोंदवू शकतात असे केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. दत्ता मेहत्रे यांनी सांगितले.  जिल्हाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे उद्घाटन करून केंद्रातील विविध उपक्रमांची पाहणी केली. 
सीताफळ प्रक्षेत्राची पाहणी व वृक्षारोपण
कृषी विज्ञान केंद्राने हलक्या जमिनीवर इतर पिकांऐवजी कोरडवाहू फळबागेस प्राधान्य देण्यासाठी दहा एकर प्रक्षेत्रात सीताफळाची लागवड केली आहे. चार ते साडेचार हजार सीताफळ झाडांची लागवड करण्यात आली असून चार ते पाच वर्ष वयाची झाडे आहेत. दरवर्षी उत्पादन होणाऱ्या सिताफळावर प्रक्रिया करण्याची व्यवस्थाही उभी केली आहे. यामाध्यमातून सीताफळ विक्रीसह सीताफळाचा गर विकला जातो त्यामुळे अधिक आर्थिक उत्पन्न होण्यास मदत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या व्यवस्थेची पाहणी करून शेतकऱ्यांना अधिकाधिक  कोरडवाहू फळबाग लागवडीस प्रवृत्त करावे असे केंद्रास सुचविले. शिंपाळा येथील नवीन तलाव परिसरात शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 
000000


No comments:

Post a Comment

​ वृत्त क्र.   1232 ​ स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतमध्ये आज सनद वाटप  प्रधानमंत्री आभासी पद्धतीने लाभार्थ्याशी संवाद स...