Friday, June 15, 2018


जिल्हा नियोजन समितीच्या नवनिर्वाचित
सदस्यांचे बुधवारी यशदा येथे प्रशिक्षण
नांदेड दि. 15 :- जिल्हा नियोजन समितीच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे प्रशिक्षण बुधवार 20 जून 2018 रोजी यशदा पुणे येथे आयोजित केले आहे. नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या सर्व नवनिर्वाचित मा. सदस्यांनी या प्रशिक्षणास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांना यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे येथे प्रशिक्षण देण्याबाबत मुद्दा मागील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार यशदा पुणे यांचेशी संपर्क करुन या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीची रचना व कार्यपद्धती, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती, जिल्हा नियोजन समितीच्या सभेबाबतची माहिती तसेच विविध योजनेंतर्गत कामांना मंजुरी, प्रशासकीय मान्यता व निधी वितरणाबाबतची माहिती जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना देण्यात येणार आहे. त्याआधारे समिती मार्फत जिल्हास्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास मदत होईल. हे प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर सर्व सदस्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाबाबत संकल्पना स्पष्ट होणार असल्याने योग्य प्रकारे विकास कामांचा आराखडा तयार होईल व त्याची अंमलबजावणी करण्यास गती येईल, असे जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  
0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...