Monday, March 5, 2018


वंचित शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीचे
अर्ज करण्यास 31 मार्चची मुदत
नांदेड, दि. 3 :-  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतर्गत यापुर्वी विहित कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा 1 ते 31 मार्च 2018 यादरम्यान उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे  दि. 28 फेब्रुवारी, 2018 रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला  असून या आदेशाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी 31 मार्च, 2018 पर्यंत  आपले सरकार या सेवा केंद्रावर किंवा शेतकऱ्यांना https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत: नोंदणी करुन युजर आय.डी. व पासवर्डच्या आधारे ऑनलाईन अर्ज सादर करता येतील.
पीक कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने कर्जमाफी व पीक कर्ज प्रोत्साहनपर लाभ योजना 28 जून 2017 चे शासन निर्णयान्वये जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी 1 एप्रील 2009  ते 31 मार्च 2016  या कालावधीत पीक कर्ज  घेतलेल्या  व अशा कर्जापैकी   30 जून 2016  रोजी थकबाकीदार आहे त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. याव्यतिरिक्त 2015-16 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाची उचल करुन मुदतीत परतफेड केली आहे. तसेच 2016-17 पुन्हा कर्जाची उचल करुन 31 जुलै 2017 अखेर परतफेड केली आहे अशा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25 हजारांच्या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र काही शेतकरी वैयक्तिक कारणाने किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन अर्ज करु न शकल्यामुळे कर्जमाफीच्या योजनेत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांना लाभ देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानूसार आता 1 मार्च, 2018 ते 31 मार्च, 2018 दरम्यान   आपले सरकार  पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करुन शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी स्वत: किंवा आपले सरकार पोर्टलवर माहिती भरुन ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा नि:शुल्क आहे. यासाठी अर्ज करणारा शेतकरी व त्यांच्या कुटुबांचे प्रमाणिकरण आधार क्रमांकाच्या आधारे बायोमेट्रिक पध्दतीने  किंवा मोबाईल ओटीपीद्वार केल्यानंतर संबंधत अर्ज अपलोड करण्यात येणार आहेत.
कर्जमाफी योजनेअंतर्गत यापुर्वी विहित कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी दि. 31 मार्च 2018 पर्यंत आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा शेतकऱ्यांना https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत: नोंदणी करुन युजर आय.डी. व पासवर्डच्या अधारे ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन प्रवीण फडणीस, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी केले आहे.  
000000

No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...