Friday, February 2, 2018

महाराष्ट्राला सकारात्मक व सौहार्दपूर्ण बनविणारा
सोशल मीडिया महामित्र
गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. दिवसेंदिवस त्याचा आवाकादेखील वाढतच चालला आहे. आज तरुणाईच्या हातात असलेले स्मार्टफोन आणि त्या स्मार्टफोनला आपसूकच चिकटलेल्या सोशल मीडियाने जग एका क्लिकवर जवळ आणले आहे.  सोशल मीडियाच्या या अद्भूत चमत्काराने आज धावपळीच्या आणि धकाधकीच्या पण काहीशा एकसुरी आयुष्यात जणू चैतन्यच अवतरले आहे. विविध सोशल नेटवर्किंग साईट्स आणि मॅसेजिंग अॅपच्या माध्यमातून संवादाचे एक आभासी विश्व निर्माण निर्माण झाले आहे. बघता-बघता कुटूंबीय, शाळा, सोबत्यांचे, ऑफिस मधील सहकाऱ्यांचे असे एकेक ग्रुप आकार घेऊ लागले आणि या आभासी विश्वात आपण अधिकाधिक जवळ येत गेलो, अधिक सोशलझालो. सोशल मीडियाचा सकारात्मक व समाजोपयोगी वापर करणाऱ्या व्यक्तिंची दखल घेऊन त्यांच्या प्रयत्नांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने  सोशल मीडिया-महामित्रनावाचा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.
सोशल मीडियाचा वापर संवादासाठी वाढला असला तरी सोशल मीडियाचा विधायक उपयोग देखील होत आहे. एकदा शेजारच्या  गावात वाटमारी  झाली, वाटमारीत सहभागी असणारे चोरटे चोरी करुन गावच्या दिशेने निघाले, तितक्यात गावच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर त्या शेजारच्या गावातील एका मित्राचा वाटमारीबाबत माहिती देणारा व चोरांच्या गाडीचे वर्णन सांगणारा मेसेज येऊन धडकला. त्यामुळे लागलीच गावातील तरुण मंडळ सावध झाले, त्यांनी त्या चोरांना पकडण्यासाठी गावातील चौकात जोरात फिल्डिंग लावली, आणि आश्चर्य काही वेळातच ते चोर अलगद येऊन तरुणांच्या हाती सापडले. मग काय तरुणांनी त्या चोरांना मनसोक्त चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.  कदाचित इथे ते चोरही गोंधळले असतील की  इतक्या कमी वेळात आपण पकडले गेलो तरी कसे ? खरं तर ही सर्व कमाल नव्या तंत्रज्ञानाची व सोशल मीडियावरील संवादाची म्हणावी लागेल.
वरील घटना म्हणजे  सोशल मीडियाच्या विधायक ताकदीचे एक उदाहरण आहे. आज ही ताकद  समाजाच्या विधायक फायद्यासाठी वापरणे गरजेचे आहे.  परंतु सध्या समाजातील काही अपप्रवृत्तीकडून या सोशल मीडियाचा गैरवापर सुरु आहे. त्यांच्याकडून सामाजिक शांतता भंग करुन समाजात अराजकता पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.  जाणीवपूर्वक अफवा पसरवून सामाजिक संघर्ष घडविण्यासाठी खोटी माहिती पसरवणे , जाती-धर्मात तेढ वाढेल अशा प्रकारचा गैरवापर या माध्यमाचा होत आहे, अशा प्रकारांवर आणि अपप्रवृत्तींवर कायदेशीर वचक ठेवण्याबरोबरच समाजातील एक सुजाण आणि जबाबदार नागरिक म्हणून आपण देखील हा प्रयत्न हाणून पाडणे गरजेचे आहे.
आज सोशल मीडियाचा चांगला व सकारात्मक उपयोग करणारे देखील मोठ्या प्रमाणात सुज्ञ नागरिक आहेत. जे कुठल्याही अयोग्य गोष्टींचा आधार न घेता कुठलेही टोकाचे राजकारण न करता केवळ आनंद पसरावा , समाजात चांगल्या गोष्टींची सुरुवात व्हावी, एखाद्या चांगल्या प्रयोगाला , उपक्रमाला लोकांपर्यंत आणावे अशा सद्हेतुने सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मीडियाचा अशा पध्दतीने सकारात्मक व समाजोपयोगी वापर करणाऱ्या व्यक्तींची दखल घ्यावी , त्यांच्या प्रयत्नांना मोठे व्यासपीठ मिळावे अशा महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने  सोशल मीडिया-महामित्रनावाचा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.
काय आहे हा उपक्रम?
ज्ञान आणि मनोरंजनाच्या साधनाबरोबरच लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. ही बाब समोर ठेऊन सोशल मीडियाचा सदुपयोग समाजात अधिक विवेकवादी आणि सकारात्मक दृष्टीकोन तयार व्हावा म्हणून करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सोशल मीडिया महामित्रउपक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा फायदा काय?
सोशल मीडिया महामित्रउपक्रमात पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींना मिळणार मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने डिजिटल प्रशस्तीपत्र.
*  सोशल मीडिया क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींना भेटण्याची, प्रत्यक्ष संवादाची,सेल्फी घेण्याची मिळणार संधी
या उपक्रमात मी कसा सहभागी होऊ?
महामित्रउप्रकमासाठी दिनांक 1 ते 18 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येईल.
गुगल प्ले स्टोअर’/ ‘ॲप स्टोअरवरुन महामित्र (Maha Mitra) हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करुन घ्या.
*  राज्यातील 15 वर्षावरील कोणीही रहिवासी विनाशुल्क सहभागी होऊ शकेल.
*  अ‍ॅप्लिकेशनमध्ये नाव, वय, पत्ता हे तपशील देऊन नोंदणी करा
कशी होणार निवड?
*  प्रत्येक तालुक्यातून (क्षेत्रातून) निवडले जाणार प्रत्येकी 10सोशल मिडिया महामित्र’.
*  या 10 जणांना जिल्हास्तरावर विशेष कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाणार. या महामित्रांची जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्या समवेत समाजमाध्यमाच्या सदुपयोगाबाबत होणार गटचर्चा.
*  या गटचर्चेअंती तालुक्यातील (क्षेत्रातील) प्रत्येकी एका महामित्राची राज्यस्तरावरील कार्यक्रमासाठी होणार निवड.
*  जिल्हास्तरावरील कार्यक्रम अंदाजे होणार 5 ते 17 मार्च या कालावधीत.
*  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या राज्यस्तरावरील कार्यक्रमात समाज माध्यम क्षेत्रात प्रभावी अशा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांना केले जाणार आमंत्रित.
*  याच कार्यक्रमात सोशल मिडिया महामित्रपुरस्काराने होणार गौरव.
*  उपस्थितीत मान्यवरांशी साधता येईल संवाद
महामित्रनिवडीचे निकष काय?
*  विविध मॅसेजिंग ॲपच्या सर्वाधिक टॉप 5 ग्रुपमधील कॉन्टॅक्ट्सची संख्या. (5 गुण)
*  फोनबुकमधील एकूण कॉन्टॅक्ट्सची संख्या. (15 गुण)
*  किती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म / मॅसेजिंग ॲप्लीकेशन उपयोगात आणण्यात येत आहेत. (10 गुण)
*  सहभागी व्यक्तीला त्याच्या स्नेहीजनांनी दिलेली मते (20 गुण)
*  सोशल मीडियातील प्रभाव आजमावण्यासाठी सहभागी व्यक्तीला पाठविलेल्या संदेशापैकी किती संदेश त्यांनी वितरित केले आहेत (15 गुण)
*  आलेल्या संदेशाचे पाठविलेल्या संदेशाशी गुणोत्तर. (10 गुण)

वरील गुणांकन ॲपमध्ये ऑनलाईन दिले जाईल. त्याप्रमाणे  एकूण सर्व सहभागींच्या तुलनेत आपले स्थान (रँक) काय आहे हे त्या सहभागी व्यक्तीला दिसेल.  निकषात असलेल्या 75 गुणांच्या आधारे प्रत्येक तालुक्यातील (क्षेत्रातील) टॉप 20 सहभागी व्यक्तींची प्राथमिक फेरीत निवड करण्यात येईल. सहभागी व्यक्तीने या मोहिमेकरिता एक संदेश (मजकूर, ॲनिमेशन, ग्राफिक्स आदी) तयार करावा व तो ॲपमार्फत आयोजकांना पाठवावा. या संदेशाच्या आधारे 20 मधून 10 जणांची गट चर्चेसाठी  निवड करण्यात येईल.   गटचर्चेतील सहभागाआधारे 15 पैकी गुण देऊन  या 10 व्यक्तींपैकी एकाची राज्यस्तरावरील कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.
सोशल मीडियाचा सकारात्मक व अभिनव उपयोग करणाऱ्यांसाठी सोशल मीडिया-महामित्रहे नाविन्यपूर्ण व्यासपीठ महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करुन दिले आहे. तेव्हा, चला महाराष्ट्राला सकारात्मक व सौहार्दपूर्ण बनविण्यात आपला हातभार लावण्यासाठी महामित्रउपक्रमात सहभागी  होऊ या...!

- शरदमणी मराठे / अभिजित झांबरे-पाटील

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...