Monday, November 20, 2017

श्रीक्षेत्र माळेगाव येथे भव्य कृषि प्रदर्शन
- कृषि समिती सभापती दत्तात्रय रेड्डी
नांदेड दि. 20 :- श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रेत भव्य अत्याधुनिक कृषि प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.  यासाठी सर्व उत्पादक कंपनी त्यांचे प्रतिनिधी यांनी सहकार्य करुन प्रदर्शनात सहभाग नोंदवून शेतकऱ्यांना उपयुक्त असलेले तंत्रज्ञान प्रात्याक्षिकाच्या माध्यमातुन उपलब्ध करुन दयावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती दत्तात्रय रेड्डी यांनी केले.
श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रेनिमित्ताने भव्य कृषि प्रदर्शनाचे आयोजनासाठी सभापती श्री. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील बियाणे, रासायनिक खत,औषधी, सुधारित कृषि औजारे इत्यादी कंपन्याच्या प्रतिनिधीची बैठक जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत अत्याधुनिक कृषि प्रदर्शनाच्या ठिकाणी शेतकऱ्यांना विविध कृषि योजना, सुधारित कृषि तंत्रज्ञान, ठिबक तुषार सिंचन संचची माहिती देण्यात येणार आहे. कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी सगरोळीमार्फत माती परिक्षण फिरती प्रयोग शाळेद्वारे शेतकऱ्यांचे मातीचे नमुने तपासण्यात येणार आहे. प्रदर्शनाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना विविध पिकाच्या लागवडीसंबंधी कृषि विषयातील तज्ज्ञ व्यक्तीकडुन माहिती देण्याचे नियोजन करण्यासाठी चर्चा करण्यात आली. तसेच प्रदर्शनात विविध ट्रॅक्टर तसेच ट्रॅक्टर चलीत औजारांच्या कंपनीमार्फत स्टॉल लावण्यात येणार असून शेतकऱ्यांना त्याव्दारे माहिती देण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात किटकनाशक औषधी वापराबाबत शेतकऱ्यांना सुरक्षाकीट प्रात्यक्षीक शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्याच्यादृष्टीने एस.एस.वाय. मार्फत माहिती देण्यात यावी अशा सुचना दिल्या. प्रदर्शनात फळे, भाजीपाला मसाला पिके या बाबत स्पर्धा आयोजित करण्यात आली असून प्रत्येक नमुन्यातून तीन बक्षीसे देण्यात येणार आहेत प्रथम बक्षीसासाठी 4 हजार रुपये, द्वितीय बक्षीसासाठी 3 हजार रुपये तृतीय बक्षीसासाठी 2 हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच या कृषि प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या दिवशी जिल्हा परिषदमार्फत देण्यात येणारे कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. पंचायत समितीमार्फत निवड झालेल्या शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे.
बैठकीस कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे, कृषि उपसंचालक श्रीमती एम. आर. सोनवणे, बियाणे खते औषधी विक्रेते असोसिएशनचे दिवाकर वैद्य, कृषि विज्ञान केंद्र सगरोळी पोखर्णीच शास्त्रज्ञ डॉ. देशमुख डॉ. शिंदे, मोहिम अधिकारी विनायक सरदेशपांडे, जिल्हा कृषि अधिकारी एस. एच. कऱ्हाळे, श्री. चंद्रवंशी  तसेच बियाणे खते औषधी सुधारित कृषि औजारे कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.  

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...