Monday, May 8, 2017

शेतकरी, शेतमजुराच्या मुलींसाठी
शुभमंगल सामुहीक नोंदणीकृत विवाह योजना
आर्थिक  बोजा पडू नये यासाठी नोंदणीकृत विवाह सर्वोत्तम उपाय
नांदेड, दि. 8 :- राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने शेतकरी, शेतमजुराच्या मुलींच्या सामुहीक विवाहासाठी शुभमंगल सामुहीक/ नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी, लाभ घेऊ इच्छिणांऱ्यांनी अधिक माहिती व तपशीलासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
 या योजनेअंतर्गत शेतकरी शेतमजूर कुटूंबातील मुलींच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसुत्र व इतर वस्तुंची खरेदी करण्यासाठी प्रती जोडपे दहा हजार रुपे अनुदान देण्यात येते व सामुहीक विवाह आयोजित करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेस प्रती जोडप्यामागे दोन हजार रुपये एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान विवाहाचे आयोजन , समारंभाचा तदनुषंगिक खर्च, नोंदणी शुल्क यासाठीचा खर्च भागविण्यासाठी देण्यात येतो.
            सदर योजनेच्या अनुदानास पात्र ठरण्यासाठी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 1,00,000/- (अक्षरी रु. एक लाख) इतकी राहील. अशा कुटूंबातील मुलींच्या विवाहासाठी प्रती जोडपे रु. 10,000/- अनुदान वधुच्या आईच्या नावाने , आई हयात नसल्यास वडीलांच्या नावे व आई-वडील दोन्हीही हयात नसल्यास वधुच्या नावे देण्यात येईल.
            याशिवाय या योजनेअंतर्गत जे जोडपे सामुहिक विवाह सोहळयात सहभागी न होता सरळ विवाह नोंदणी कार्यालयात (Office of the Registrar ofg Marriage) जावून नोंदणीकृत विवाह (Registered Marriage)  करतील, त्यांना ही रुपये 10,000/- (अक्षरी दहा हजार ) इतके अनुदान विहित अटी व शर्तीची पुर्तता केल्यानंतर संबंधिताच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.  या योजनेख मुख्य हेतू आहे की, गरीब शेतकरी, शेतमजूर यांच्यावर विवाहाचा आर्थिक  बोजा पडू नये, या दृष्टीने नोंदणीकृत विवाह (Registered Marriage) हा सर्वोत्तम उपाय आहे. तसेच याबाबतचे शासन निर्णय महिला व बाल विकास विभागाच्या शासनाच्या संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.inउपलब्ध असून त्याचा सांकेताक क्रमांक 201110031611557001  असा आहे.

            तरी याबाबत स्वयंसेवी संस्थानी तसेच विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन विवाह करणाऱ्या जोडप्यांनी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नांदेड यांचेकडे अर्ज करावेत. अधिक माहिती व तपशीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय,24-गणेश कृपा, शास्त्रीनगर (भाग्यनगरजवळ), नांदेड - 431605, दुरध्वनी 02462 - 261242 किंवा 267800, फॅक्स - 261242, ईमेल dwcdond@gmail.com येथे संपर्क साधवा.

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...