Monday, May 8, 2017

निम्न दुधनातून येणाऱ्या पाण्याबाबत
गोदावरी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा
नांदेड, दि. 8 :-   नांदेड शहरासाठी पाणी पुरवठा या करिता नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका पाणी पुरवठा योजनेसाठी सोमवार 8 मे 2017 रोजी सायंकाळी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरी नदी काठावरील निम्न दुधना प्रकल्पाशी निगडीत नदीकाठावरील गावकऱ्यांनी सतर्कता बाळगावी, नदीपात्रालगत किंवा पात्रात जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
या आवाहनात म्हटले आहे की, नांदेड शहर पाणी पुरवठा योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी सोमवार सायंकाळपासून निम्न दुधना प्रकल्पातुन दोन हजार ते तीन हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
निम्न दुधना प्रकल्प ते विष्णुपूरी बंधाऱ्या पर्यंत पाणी पोहचण्यासाठी सुमारे शंभर तासाचा अवधी लागतो. त्यामुळे नदीकाठावरील गावातील लोकांनी या कालावधीत नदीपात्रात प्रवेश करू नये, अन्य हालचाली, विहार करू नये अथवा जनावरांना नदी पात्रालगत, पात्रामध्ये सोडू नये. तसेच नदीपात्रात काही मालमत्ता असल्यास त्या वेळीच सुरक्षित स्थळी हलविण्याची व्यवस्था करावी. कोणत्याही प्रकारे मालमत्तेचे किंवा जिवीताचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
याबाबत संबंधित सर्वच यंत्रणा तसेच विविध स्तरावरील प्रशासक प्रमुख आदींनाही अवगत करण्यात आले आहे. याबाबत सर्वांनी समन्वय राखावा व विशेष दक्षता घेवून सहकार्य करावे असेही आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.

OOO

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...