Monday, April 3, 2017

आगामी सण, उत्सव शांततेत, सलोख्याने
साजरे व्हावेत - जिल्हाधिकारी काकाणी
जिल्हा शांतता समितीची बैठक संपन्न
        
  नांदेड दि. 3 :-  शहरासह, जिल्ह्यात आगामी काळातील सण, उत्सव शांतता व सलोख्याने साजरे व्हावेत. त्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे. नागरिकांनीही याकाळात आरोग्य, स्वच्छता यांची काळजी घ्यावी. अफवांवर विश्वास ठेवू  नये. प्रसंगी नियंत्रण कक्षांशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे केले. आगामी सण, उत्सव, जयंती यांच्या अनुषंगाने आयोजित जिल्हा शांतता समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे बैठक संपन्न झाली.
        बैठकीस महापौर शैलजा स्वामीही विशेष उपस्थित होत्या, तसेच मनपा आयुक्त समीर उन्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप कर्णीक, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, मनपा उपायुक्त रत्नाकर वाघमारे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॅा. बी. पी. कदम, डॅा. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी डॅा. वाय. एच. चव्हाण, तहसीलदार किरण अंबेकर तसेच महावितरण, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
          जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी आगामी सण, उत्सव यासाठीच्या विविध विभागांच्या तयारीचाही सर्वंकष आढावा घेतला. ते म्हणाले की,  सण, उत्सव मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरे केले जातात. पण दिवस तीव्र उन्हाळ्याचे आहेत. त्यामुळे उत्साहाच्या भरात आरोग्याकडे दुर्लक्ष, त्यातून शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे याकाळात वेगवेगळ्या ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, त्यासाठी काही घटकांनी स्वयंस्फुर्तीने पुढे यावे, असे प्रयत्न व्हावेत. मिरवणुकांच्या मार्गावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. मिरवणूक मार्गांसह, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणचा वीज पुरवठा अखंडीत राहील याकडे लक्ष दिले जावे. मिरवणूक मार्गावरील राडा-रोडा हटविण्यात यावा, खड्डे बुजविण्यात यावेत, साफ-सफाई करण्यात यावी. आरोग्य विभागाने रुग्णवाहिका, आवश्यक औषधे यांच्या उपलब्धतेबाबत दक्षता घ्यावी. या काळात पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तरीही स्वयंशिस्त ही बाब महत्त्वाची आहे. त्याची सुरवात प्रत्येकांने स्वतःपासून सुरवात करावी.
         उत्सव, सण या काळात अप्रिय घटना टाळण्यासाठी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच या काळात जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस, महानगरपालिका, अग्नीशमनदल यांचे नियंत्रण कक्ष सदैव सतर्क राहतील, असेही सांगितले.
         महापौर श्रीमती स्वामी यांनीही पवित्र सण, उत्सव साजरे करताना नागरिक नेहमीच प्रशासनाला सहकार्य करीत असतात, ही परंपरा याहीवर्षी अखंडीत राहील. सण-उत्सव शांततेत साजरे होतील, असा विश्र्वास व्यक्त केला.
         पोलीस अधीक्षक कर्णीक म्हणाले की, जिल्ह्यात आणि शहरात सण, उत्सव शांततेत साजरे करण्याची चांगली परंपरा आहे. तरीही पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताच्या दृष्टीने सर्वोतोपरी तयारी केली आहे. अधिकचे पोलीस बळ आणि विविध साधनसामुग्री, उपाय योजना याद्वारे सज्जता ठेवण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तयारीला नागिराकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यापुढेही त्यांचे सहकार्य राहील. मनपा उपायुक्त वाघमारे यांनी स्वच्छता, वीज, पिण्याचे पाणी, मोकाट जनावरांना प्रतिबंध या उपाययोजनांबाबत माहिती दिली. तहसिलदार अंबेकर यांनीही उत्सव काळात पोलीसांशी सातत्यपुर्ण समन्वय राहील. पोलीस स्थानक निहाय संपर्क अधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती केल्याची माहिती दिली. यावेळी शांतता समितीच्या सदस्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. निवासी उपजिल्हाधिकारी कारभारी यांनी बैठकीचे संयोजन केले. अप्पर पोलीस अधीक्षक डोईफोडे यांनी आभार मानले.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...