Sunday, October 2, 2016

 बिलोली बोळेगाव परिसरात पुरात अडकलेल्यांच्या
सुटकेसाठी अग्निशमन दल , एनडीआरफकडून मोहीम
मांजरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
नांदेड, दि. 2 :- बिलोली तालुक्यातील बोळेगाव येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्यांच्या सुटकेसाठी राबविण्यात येत असलेली मोहीम सायंकाळी थांबविण्यात आली. प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर मांजरा नदीच्या पात्रात अडकलेल्या काही व्यक्तींच्या सुटकेसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि महापालिकेच्या अग्निशमन दल यांच्याकडून ही मोहीम राबविण्यात येत होती. मोहिमेत नदी पात्रात दूरवर जाऊन शोध घेण्यात आला. यांत्रिकी बोटी आणि प्रकाश झोतातही पुराच्या पाण्यात व्यक्तींचा किंवा अन्य ठावठिकाणा न लागल्याने सायंकाळी मोहीम थांबविण्यात आली. आवश्यकता भासल्यास उद्या दिवसाच्या प्रहरात पुन्हा शोधमोहिम राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. याबाबत नदी प्रवाहाच्या पुढील नियंत्रण कक्षांनाही सतर्क करण्यात आले आहे. तेलंगणातील संबंधीत यंत्रणानाही माहिती देण्यात आली आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थान प्रतिसाद दलाचे पथक बोळेगाव येथे कार्यरत असून, या पथकाचा तळ नरसी येथे ठेवण्यात येणार आहे. यांत्रिकी बोटीसह, आपत्ती व्यवस्थानाच्या साधनसामुग्रीने सज्ज हे पथक पुढील काही दिवस नांदेड जिल्ह्यातच राहणार आहे.
मांजरा नदीच्या पाणी पातळीत बीड जिल्ह्यातील धरणातून सुरु असलेल्या विसर्गामुळे वाढ होण्याची शक्यता असल्याने नदी काठच्या गावांना आणि सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे. नागरिकांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये, नदी पात्राशी लगत भागांनी अधीक सतर्कता बाळगावी, तसेच अफवावंवर विश्वास न ठेवता, अडचणी व मदतीसाठी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
 जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवर जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत यंत्रणा आज दिवसभरही पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कार्यरत होत्या. तसेच जिल्‍हयातील देगलूर, मुखेड, कंधार व बिलोली तालुक्‍यातील 32 गावे पुराच्‍या प्रवाहात येत असल्‍याचे निदर्शनास आल्‍याने त्‍या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देऊन एकूण 7 ठिकाणी त्‍यांची तात्‍पुरत्‍या रहाण्‍याची व्‍यवस्‍था करून खबरदारीची उपाययोजना करण्‍यात आली होती. पण आता पुराचे पाणी हळूहळू ओसरल्‍याने या लोक पुर्ववत त्यांच्या घराकडे परतत असल्याचीही माहिती, प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.     
पुराच्या पाण्यामुळे आतापर्यंत सहा जण दगावल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे. नदी काठच्या शेत जमिनीचे आणि पिकांचेही नुकसान झाले आहे, त्याचीही माहिती एकत्रित करण्यात येत आहे. याबाबत राज्यस्तरावरील यंत्रणा तसेच विभागीय आयुक्तालय यांना वेळोवेळी अहवाल पाठविण्यात येत आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1151 ​महाराष्‍ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षेबाबत उमेदवारांना सूचना · रविवार 1 डिसेंबर रोजी परीक्षेचे आयोजन ना...