कृपया सोबतच्या वृत्तास आपल्या लोकप्रिय
दैनिकातून प्रसिद्धी दयावी ही विनंती. - जिल्हा माहिती कार्यालय नांदेड
माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयाच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र
प्रदर्शनातून उमटले राज्याच्या विकासाचे प्रतिबिंब
-
मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार
मुंबई, दि. 2 :-
माहिती
व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित केलेल्या महाराष्ट्र माझा छायाचित्र
प्रदर्शनातून बदलत्या महाराष्ट्राचे प्रतिबिंब उमटले आहे, असे गौरवोद्गार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.
प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला
अकादमीच्या कलादालनात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र माझा छायाचित्र
प्रदर्शनाचे उद्घाटन व स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्काराचे वितरण
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषि
राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश
सिंह, ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री
सुधारक ओलवे उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की,
या छायाचित्र प्रदर्शनात मांडण्यात आलेली सर्व छायाचित्रे अत्यंत सुंदर आहेत.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने चांगली संकल्पना प्रत्यक्षात आणली. राज्यात दोन
वर्षात घडलेल्या परिवर्तनाचे प्रतिबिंब या छायाचित्रांमधून उमटले आहे. एखादी गोष्ट
प्रत्यक्ष बघितल्याशिवाय विश्वास बसत नाही अशा वेळी छायचित्र ही महत्वाची भूमिका
बजावत असतात, असे सांगून ते पुढे म्हणाले की, छायचित्रकला ही नैसर्गिक स्वरूपात
अभिव्यक्त होण्याचे माध्यम आहे. एका छायाचित्रातच हजार शब्दांचा
आशय सामावलेला असतो. माध्यमांमध्ये छायाचित्रांशिवाय बातमीला महत्व नाही, असे
सांगत मुख्यमंत्र्यांनी छायाचित्रकारांचा गौरव केला.
प्रदर्शनातील छायाचित्रांमधून मेक इन
महाराष्ट्र, जलयुक्त शिवार, स्मार्ट सिटी अशा विविध शासकीय योजनांच्या यशाचे
प्रतिबिंब उमटले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील गड किल्ले, कला, संस्कृती,
वन्यजीव, बहुविविधतेचे आणि एकात्मतेचे दर्शनही होत आहे. या प्रदर्शनातील छायाचित्रांचा
समावेश असलेले ‘कॉफी टेबल बूक’ तयार करावे.
राज्यात येणाऱ्या परदेशी शिष्टमंडळांना हे पुस्तक सचित्र महाराष्ट्राचा ठेवा
म्हणून भेट देता येईल, दरवर्षी अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करावे, अशी सूचनाही
त्यांनी यावेळी केली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव
ब्रिजेश सिंह यावेळी म्हणाले की, लोकांच्या नजरेतला महाराष्ट्र या छायाचित्रांच्या
माध्यमातून दिसत असून प्रत्येक छायाचित्र आपली एक वेगळी कथा आहे. दोन वर्षांतील
राज्याची प्रगती आणि जनतेमधील चैतन्य, राज्याचे प्रतिमा संवर्धन या छायाचित्रांमधून
होत आहे. या सर्व छायाचित्रांचा समावेश असलेले कॉफी टेबल बुक तयार करण्यात येईल. प्रदर्शनासाठी
राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे 3800 छायाचित्रे प्राप्त झाली. दरवर्षी
अशा प्रकारची स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येईल, असेही त्यांनी
प्रास्ताविकपर भाषणात सांगितले.
छायाचित्र हे समाजाचे दस्तावेज असून नवीन
पिढीसाठी इतिहास सांगण्याचे काम ते करीत असतात. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी
योजनांचे यश या छायचित्रांमधून दिसत आहे, असे श्री. ओलवे यांनी यावेळी सांगितले.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून छायाचित्रकारांना
राजाश्रय मिळाल्याची भावना प्रथम क्रमांक विजेते देवदत्त कशाळीकर यांनी आपल्या
मनोगतातून व्यक्त केली.
यावेळी छायाचित्र स्पर्धेतील प्रथम क्रमांक
विजेते देवदत्त कशाळीकर, द्वितीय क्रमांकाचे विजेते विद्याधर राणे, तृतीय
क्रमांकाचे विजेते दिनेश भडसाळे यांना
अनुक्रमे पंधरा हजार, दहा हजार व पाच हजार रुपयांचा धनादेश आणि प्रमाणपत्र देऊन
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ बक्षिस विजेते सचिन
मोहिते, अशोक पाटील, चंद्रकांत पाटील, शरद पाटील, सतिश काळे यांना प्रत्येकी एक
हजार रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
छायाचित्र स्पर्धेचे परिक्षक श्री. ओलवे,
गॅझेटर्स विभागाचे कार्यकारी संपादक डॉ. दिलीप बलसेकर, पीआयबीचे मुख्य फोटो
अधिकारी अख्तर सईद, माध्यम तज्ज्ञ आशुतोष पाटील यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते करण्यात आला. प्रदर्शनाच्या ठिकाणी मांडण्यात आलेल्या लोकराज्य अंकाच्या
स्टॉलला मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी भेट दिली.
या कार्यक्रमास संचालक अजय अंबेकर, संचालक
देवेंद्र भुजबळ, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रा. ना. मुसळे, पुरस्कार
विजेत्यांचे कुटुंबिय यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. संचालक शिवाजी मानकर
यांनी आभार मानले. पल्लवी मुजुमदार यांनी सूत्रसंचालन केले.
दि. 5 ऑक्टोबर 2016 पर्यंत हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत
सर्वांसाठी खुले राहणार आहे.
0000000
अजय जाधव..2.10.2016
No comments:
Post a Comment