Sunday, October 2, 2016

राष्ट्रपुरूषांच्या विचारांवर कृती करण्यातूनच
त्यांना खरी आदरांजली - जिल्हाधिकारी काकाणी
महात्मा गांधी, माजी पंतप्रधान शास्त्री यांना जयंती दिनी अभिवादन

नांदेड, दि. 2 :- राष्ट्रपुरूषांच्या विचारांवर, आदर्शावर, कर्तव्यावर प्रत्यक्ष कृती करण्याने त्यांच्या स्वप्नातील भारत साकारता येईल, असे विचार जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे व्यक्त केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमात स्वच्छता अभियानाची शपथही उपस्थितांना देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील बचत भवन येथे कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी श्रीमती ढालकरी, जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. थोरात, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी आदींची उपस्थिती होती.
श्री. काकाणी पुढे म्हणाले की, महान राष्ट्रीय पुरूषांच्या विचारावर कृती करणे ही काळाची गरज आहे. विशेषतः संघटीत क्षेत्रावर त्यांच्या विचारांवर कर्तव्य म्हणून काम करणे आवश्यक आहे. असंघटीत आणि गोरगरीब, सामान्य जनतेच्या हितासाठी कार्यरत रहाणे ही या राष्ट्रीय पुरुषांना खरी आदरांजली ठरेल. त्यासाठी आपली शक्ती सकारात्मक कामांसाठी वापरावी लागेल. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूरशास्त्री यांचे जीवन हाच एक मोठा संदेश आहे.
सुरवातीला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील, तसेच अप्पर कोषागार अधिकारी श्री. पाचंगे यांची समयोचित  भाषणेही  झाली.  निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी सुत्रसंचलन केले व आभार मानले. कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000000



  


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...