“उज्ज्वल नांदेड” संकल्पना यशस्वी करण्यासाठी
सकारात्मक प्रयत्न करा - जिल्हाधिकारी काकाणी
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी अभिरूप मुलाखतींचे आयोजन
नांदेड, दि. 16 :- उज्ज्वल नांदेडची संकल्पना
यशस्वी करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी
यांनी आज येथे केले. उज्ज्वल नांदेड संकल्पनेतील स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन
अभियानात आज अधिव्याख्याता, ज्येष्ठ अधिव्याख्याता व प्राचार्य पदासाठीच्या राज्य
लोकसेवा आयोगाच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांसाठी दोन दिवसीय मुलाखत
मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराच्या प्रारंभाप्रसंगी
जिल्हाधिकारी काकाणी बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे
शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात बुधवार 17 ऑगस्ट रोजी अभिरूप मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक मनोहर भोळे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण
संस्थेचे प्राचार्य बी. बी. पुटवाड, उपजिल्हाधिकारी अजित थोरबोले, तहसिलदार सुरेश
घोळवे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे, समाजकल्याण अधिकारी या
मुलाखत-मंडळाद्वारे उमेदवारांच्या मुलाखती
घेण्यात येणार आहेत.
आज बचत भवन येथे सुमारे 27 उमेदवार उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना
जिल्हाधिकारी काकाणी म्हणाले की, मुलाखतीसाठी सुक्ष्म गोष्टींचे नियोजन करणे
आवश्यक असते. अवघ्या काही मिनिटांच्या मुलाखतीत उमेदवाराच्या व्यक्तीमत्त्वाविषयी
मुलाखत-मंडळाला खूप काही जाणून घ्यावयाचे असते. त्यासाठी पुरेपूर तयारी आणि
सकारात्मक याबाबीच महत्त्वाच्या ठरतात. देहबोलीपासून पेहराव अशा अनेक बाबींतील
सहजता महत्त्वाची ठरते. शिक्षण, आपल्या परिसराची जाण, बौद्धीक पातळी, छंद याबाबतची
स्पष्टता महत्त्वाची ठरते. मुलाखतीत यश मिळो किंवा न मिळो सकारात्मक प्रयत्न आणि
सकारात्मक वृत्ती याबाबीही महत्त्वपुर्ण ठरतात. त्यामुळे पद कोणतेही असो
त्यासाठीची तयारी, मुलाखत यासाठी सकारात्मकता बाळगणे आवश्यक ठरते. या सकारात्मक
वृत्तीतून आणि प्रयत्नातून उज्ज्वल नांदेडची संकल्पना साकार करता येईल, असेही
त्यांनी सांगितले.
सुरवातीला जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर
शिबिरात विविध सत्रात उपजिल्हाधिकारी थोरबोले आदींनीही विविध सत्रात मार्गदर्शन
केले.
000000
No comments:
Post a Comment