Tuesday, August 16, 2016

लेख

मुद्रा योजनेमुळे दुणावला व्यवसायाचा आत्मविश्र्वास

स्वत:चा व्यवसाय  करायचा हा विचार सतत मनात यायचा. पुण्यामध्ये चांगल्या चांगल्या पगाराची नोकरी असताना सुध्दा त्यात मन रमत नव्हतं.  बस्स एक कारण मात्र मिळाले आणि क्षणार्धात पुणे आणि पुण्याकडील नोकरी सोडून गावी जाऊन व्यवसाय करायाचा निर्णय घेतलाप्रभाकर कदम हे सांगत होते. मुद्रा योजनेतून आर्थिक पाठबळ मिळाल्याने कदम आता समाधानाने आपला व्यवसाय चालवित आहेत.
श्री. कदम पुढे सांगत होते, पुण्यातून सर्व सामानासहीत गावी हजर झालो. घरच्यांना हा निर्णय सांगितल्यानंतर थोडा धक्काच बसला. मग वडिलांनी विचारले, बरं मग व्यवसाय / धंदा करणार काय? याचा तर विचारच केला नव्हता. माझे शिक्षण संगणक क्षेत्रातले झालेले असल्याने त्याच्याशी निगडीतच व्यवसाय करायचा ठरले, त्याला साथ मिळाली प्रधानमंत्री मुद्रा योजनेची आणि त्यातूनच उभ राहिले गावापासून जवळच बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या अर्धापूर येथे कदम IT सर्व्हिस सेंटर.
प्रभाकर कदम, मुळचे हिंगोली जिल्हयातील कळमनुरी तालुक्यातील वरुड येथील आहेत. गेल्या चार वर्षांपासून त्यांचा अर्धापूर येथील हा व्यवसाय सुरळीत सुरु आहे. कदम यांनीच आपला प्रवास सांगितला. कदम यांचे शालेय शिक्षण वरूड येथे व त्यानंतरचे शिक्षण डोंगरकडा येथील कै. बापूराव देशमुख शाळेत पुर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी गावापासून 25 कि.मी.अंतरावरील नांदेड शहर गाठले. 11 वी , 12 वी मौजमजेत झाले.  12 वी नंतर काय करायचे हा प्रश्न होता. काही मित्र व मोठा भाऊ  माधव कदम एम.ए. इंग्रजी च्या प्रथम वर्षात होता. त्यांच्याकडूनच तंत्रनिकेतन (पॉलीटेक्नीक) ला प्रवेश घेण्याचा सल्ला मिळाला. मग काय प्रवेश अर्ज भरला. प्रवेशाच्या फेऱ्या चालू झाल्या. शेवटच्या फेरीत ‘Diploma in Computer-IT’ ला प्रवेश मिळाला. तो अभियांत्रिकाचा हा पदविका अभ्यासक्रम (डिप्लोमा) तीन वर्षात पूर्ण करुन पहिल्याच प्रयत्नात, परिसर-मुलाखतीद्वारे ( Placement -जॉब) मिळाला. पहिल्यांदा लातूर, मग अहमदनगर आणि नंतर पुणे. पण  पुण्यातील जॉबमध्ये मन रमत नव्हते. स्वत:चा व्यवसाय करायया, या विचाराने विचाराने नेहमीच अस्वस्थ रहायचो. 28 फेब्रुवारी, 2014 ला पुणे सोडले ते परत मागे फिरायचे नाही या विचारानेच. आणि प्रवास सुरु झाला स्वतंत्र व्यवसायाचा. माझ्या या वाटचालीला घरच्या  लोकांची खूप साथ मिळाली. घरची परिस्थिती बरी होती. शेती आहे. वडील मोठा भाऊ शेतात काम करायचे. त्यामुळे उदरनिर्वाहाची चिंता नव्हती.
गावाकडे आल्यावर बऱ्याच विचार विनिमयानंतर संगणक म्हणजे काँम्प्युटरबद्दल माहिती असल्याने संगणक दुरुस्ती, त्यासाठीच्या प्रिंटर आदी विविध यंत्र सामुग्री-उपपकरणाची दुरुस्ती, वेगवेगळया स्पर्धा परिक्षांचे फॉर्म ऑनलाईल भरणे अशी प्राथमिक सुरुवात केली. सुरवात एक संगणक- एक प्रिंटर यांच्या सहायाने झाली. हळूहळू लोकांना माहिती झाली की आमच्याकडे एकाच छताखाली दुरुस्ती व ऑनलाईन कामे, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन अगदी माफक दरात होते. चांगल्या सेवेमुळे बाजारपेठेत नाव झाले. ग्राहकांची संख्या वाढली. या सेवा केंद्रांचे रुपांतर आज दोन संगणक, एक मोठे झेरॉक्स मशिन, एक कला प्रिंटर, लॅमिनेशन, फॅक्स, लग्नपत्रिका छापणे, डीटीपी यांसह विविध सुविधा देणाऱ्या केंद्रात  झाले.
याच दरम्यान, माझा अर्धापूर येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेशी संपर्क वाढला, व तिथेच माहिती झाली प्रधानमंत्री मुद्रा योजनेची.  यासाठी बँकेच्या व्यवस्थापकांनी मदत केली. योजनेबाबत सविस्तर माहिती दिली व सर्व निकष पुर्ण केल्यानंतर 50 हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले. या रकमेत जवळचे काही बचतीची रकम एकत्र करून मोठे झेरॉक्स मशिन व कलर प्रिंटर घेतले, व्यवसाय वाढवला. यातूनही व्यवसायाला चांगली गती मिळाला. त्यामुळे आजच्या परिस्थितीत खूप समाधानी आहे, आता घरच्यांना पण माझी मदत होते. मोठा भाऊ पण मदत करतो. प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे मला भरपूर मदत झाली. बँकेने माझ्या व्यवसायाची पहाणी करुन व्यवसायवाढीसाठी पुढील काळात आणखी आर्थिक पाठबळ मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. कदम यांचा मुद्रा योजनेमुळे आत्मविश्र्वास दुणावला आहे, ते सांगतात, या प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे मला आता आणखी आत्मविश्र्वास मिळाला आहे. व्यवसाय विस्ताराचा आणि त्याद्वारे रोजगार निर्मितीचाही आता मी विचार करू लागलो आहे. मला व्यवसाय मिळाला, आता आणखी काहींना रोजगार मिळेल, हे सर्व काही मुद्रा योजनेच्या साह्यामुळेच, हे मला नमूद करावे लागेल.                                                                                 
-         राष्ट्रपाल सरोदे, नांदेड

(लेखक जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड येथे आंतरवासिता करीत आहेत.)

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...