वृत्त क्रमांक 1242
सायट्रस प्रोसेसिंगसाठी फळ उत्पादन व प्रक्रियाक्षेत्र उपयुक्त-जिल्हाधिकारी
कृष्णूर येथे सह्याद्री फार्म्स सायट्रस प्रोसेसिंग युनिट भेट
नांदेड, दि. 26 नोव्हेंबर :- नांदेडच्या कृष्णूर एमआयडीसी परिसरात सायट्रस प्रोसेसिंगसाठी उपलब्ध असलेली एकात्मीक सुविधा जिल्ह्यातील फळ उत्पादन व प्रक्रिया क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
संविधान दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कृष्णूर एमआयडीसी येथील सह्याद्री फार्म्स सायट्रस प्रोसेसिंग युनिटला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. सह्याद्री फार्म्सच्या टीमतर्फे जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
सह्याद्री फार्म्सचे कार्य, सायट्रस प्रोसेसिंग युनिटची वैशिष्ट्ये, कार्यपद्धती व कृषी मूल्यसाखळीबाबत सादरीकरण करण्यात आले. सादरीकरणानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी युनिटमधील विविध विभागांची पाहणी केली. यामध्ये सायट्रस फळांचे इनकमिंग क्षेत्र, गुणवत्ता तपासणी, फळ उतरवणे, जेबीटी मशीनद्वारे प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा तसेच शून्य कचरा धोरणावर आधारित उत्पादन प्रणाली यांचा समावेश होता. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उच्च दर्जाच्या लगदा (रस), तेल तसेच इतर मूल्यवर्धित उत्पादने निर्माण करण्याची क्षमता पाहून ते विशेष प्रभावित झाले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नांदेड जिल्ह्यात लिंबूवर्गीय फळांची लागवड वाढवणे, शेतकऱ्यांसाठी जागरूकता कार्यशाळा आयोजित करणे तसेच केळी, जांभूळ, आंबा इत्यादी फळ पिकांसाठी एंड-टू-एंड इकोसिस्टम विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य देण्याची तयारी दर्शविली.
00000
No comments:
Post a Comment