वृत्त क्र. 701
डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय परिसरात 500 झाडांची लागवड
अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न
नांदेड दि. 6 जुलै:- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपूरी नांदेड परिसरात वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र व एक पेड माँ के नाम 2.0 या देशव्यापी अभियानातर्गत 5 जुलै रोजी 500 झाडांची लागवड करून वृक्षारोपन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
पर्यावरण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असून, पर्यावरण आपल्याला स्वच्छ हवा, शुध्द पाणी आणि सकस अन्न पुरवते. पर्यावरणाचे संरक्षण करणे, ही आपली सर्वाची नैतिक जबाबदारी असून, आपण सर्वानी एकत्र येवून पर्यावरणाचे संरक्षण केले तरच आपण एक चांगले भविष्य निर्माण करु शकतो असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले.
पर्यावरणामध्ये विविध नैसर्गिक संसाधने आहेत. त्यांचे जतन आवश्यक असून, जेणेकरुन भविष्यात त्यांची कमतरता भासणार नाही. पर्यावरणातील सर्व घटक एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यापैकी एका घटकावर परिणाम झाल्यास, त्याचा परिणाम इतर घटकांवरही होतो. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे संरक्षण केल्यास जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाची समस्या कमी करता येते. या वृक्षारोपणामुळे जैवविविधता जोपासण्यास हातभार लागून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल व आपल्या भावी पिढीचे जगणे सुखकर होईल असे मत अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी व्यक्त केले. पृथ्वी ही आपल्या मातेसमान असून पर्यावरणाची काळजी वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन करुन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या वृक्षारोपन कार्यक्रमात वड, कडुलिंब, पिंपळ, आवळा, बांबू, जांब, हिरडा इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमात हिंगोलीचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत गोडबोले, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय कापसे, डॉ. एस.आर. मोरे, डॉ. राजेश अंबुलगेकर, डॉ. एम.ए. समीर, डॉ. शीतल राठोड, डॉ. किशोर राठोड, डॉ. वंदना दुधमल, डॉ. आय.एफ.इनामदार, डॉ. भावना भगत, डॉ. अनिल देगांवकर, डॉ. अतिष गुजराती तसेच विविध विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मुकुंद कुलकर्णी, डॉ. पंकज कदम,डॉ. सलिम तांबे, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजीत देवगरे, प्रशासकीय अधिकारी के.बी.विश्वासराव, संजय वाकडे, नियोजन अधिकारी बालाजी डोळे, रुग्णालयाच्या अधिसेविका अलका जाधव यांचेसह वैद्यकीय अध्यापक वृंद, राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी, पदव्युत्तर विद्यार्थी व कर्मचारी यांची उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. आर.डी. गाडेकर सहयोगी प्राध्यापक यांनी केले.
0000
No comments:
Post a Comment