वृत्त क्र. 703
प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अॅग्रिस्टॅक शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै अंतिम मुदत
नांदेड दि. 7 जुलै :- प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2025-26 राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. ही योजना नांदेड जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी पत्ता : मुंबई क्षेत्रीय कार्यालय, लोक चेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र- ४०० ०५९ ई-मेल : pikvima@aicofindia.com या विमा कंपनी मार्फत राबविण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलै 2025 आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 31 जुलै 2025 पर्यंत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
ही योजना नांदेड जिल्ह्यातील अधिसूचित केलेल्या ज्वारी, मुग, उडीद, तूर, सोयबीन व कापूस या पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू असेल. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार, तसेच, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागासाठी शेतकऱ्यांना ओळखपत्र क्रमांक (अग्रिस्टॅक फार्मर आयडी) असणे अनिवार्य आहे.
शासनाच्या 11 एप्रिल, 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) 15 एप्रिल 2025 पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2025-26 मध्ये सहभागी होण्याकरीता अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) बंधनकारक राहील. त्यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक, सातबारा उतारा (जमिनीचा दाखला) घेऊन नजीकच्या सीएससी सेंटर (कॉमन सर्व्हिस सेंटर) च्या/ सहकार्याने आपली नोंदणी पूर्ण करावी व आपला शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आय.डी.) प्राप्त करुन घ्यावा. नोंदणीसाठी काही अडचण उद्भवल्यास संबंधीत गावचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांची मदत घ्यावी.
अॅग्रीस्टॅकची नोंदणी पूर्णतः मोफत आहे. कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. कृषी विकास योजना, पी एम किसान निधी, पीक विमा, नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक सक्तीचा आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या योजनेंतर्गत नोंदणी करावी व तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 31 जुलैपर्यंत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment