Monday, June 9, 2025

वृत्त क्रमांक 593

विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 11 जूनपासून ऑनलाईन अर्ज करावेत

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटींची पुर्तता करण्यासाठी 10 जून पर्यंत अंतिम मुदत

नांदेड दि. 9 जून :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत समाज कल्याण अंतर्गत  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व मागासवर्गीय मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृह योजना राबविली जाते. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या गरजू व पात्र विद्यार्थी-विद्यार्थीनींकडून नांदेड जिल्ह्यातील एकूण-16 वसतिगृहांसाठी 11 जून,2025 पासून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत.

अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्गासह इतर प्रवर्गाच्या इयत्ता आठवी, अकरावी, व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विनामुल्य प्रवेश ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे. तरी इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन पध्दतीने शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज भरावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

सन 2024-25 मधील इयत्ता 7 वी, 10 वी 12 वीचे निकाल जाहीर झाले आहेत. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रीया सुरू करणे आवश्यक असल्याने सन 2024-25 मधील स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर केलेल्या व अर्जात त्रुटी असल्याने रिर्व्हट बॅक केलेले आहेत. बराच प्रदीर्घ कालावधी होऊनही अनेक विद्यार्थ्यांनी रिर्व्हट बॅक केलेले अर्ज अजून फेर सादर केलेले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना आपल्या स्वाधार अर्जातील त्रुटी पुर्तता करण्यासाठी 10,जून,2025 (मंगळवार) ही अंतीम मुदत देण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांनी आपल्या स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पुर्तता ऑनलाईन करून घ्यावी. दिनांक 10, जून,2025 पर्यंत त्रुटी पुर्तता न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज बाद ठरतील व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधीत विद्यार्थ्याची राहील याची सर्व विद्यार्थ्यांनी गांभीर्यपुर्वक नोंद घ्यावी.

तेव्हा गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज URL:https://hmasscrutinyworkflow.mahait.org/ या  पोर्टलवर ऑनलाईन भरावे व त्याची प्रींट आऊट घेवून सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून अर्जाची एक प्रत संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणी व तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांचेकडे सादर करावे. तसेच सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात स्वाधार योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यानी देखील शासकीय वसतिगृह प्रवेशासाठीचा अर्ज ऑनलाईन भरून त्याची प्रत सर्व कागदपत्रे सोबत जोडून संबंधित गृहपाल यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. शासकीय वसतिगृहासाठी प्रवेश अर्ज न भरल्यास त्यांना स्वाधार योजनेसाठी अपात्र ठरविण्यात येईल याची दक्षता घ्यावी.

शासकीय वसतिगृहात विनामुल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य,निर्वाहभत्ता,ग्रंथालय,जिम व इंटरनेट वाय-फाय आदी सुविधा विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येतात.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.  724 देशाचा समृध्दीसाठी विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता वाढवावी – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नांदेड, दि. 14 जुलै : जगात शि...