वृत्त क्रमांक 261
बायोगॅस व सहकारी दूध संस्थांच्या निर्मितीतून स्वावलंबन व सहकाराची जिल्ह्यात पायाभरणी व्हावी
खासदार डॉ. अजित गोपछडे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
बायोगॅस व सहकारी दूध संस्था नोंदणी कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड दि. ६ मार्च : सहकारी संस्थांच्या निर्मितीतून स्वावलंबन व सहकार्याची पायाभरणी करणे गरजेचे आहे. सहकारामध्ये सर्वांच्या हक्काचे रक्षण करत ,पारदर्शीता महत्त्वाचे असते. यातून एखाद्या जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो. दुग्ध उत्पादन क्षेत्रात जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला व्यक्तिगतरित्या मदत करायला मी तयार असून यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी आज येथे केले.
केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड ( मुदा ) लि. यांच्या सहयोगातून स्वतःच्या जागेत बायोगॅस सयंत्र बसविण्यासाठी नोंदणीकृत शेतकरी तसेच सहकारी दुग्ध संस्था प्रमुख यांची गुरुवारी दुपारी कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या या कार्यशाळेला उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले उपस्थित होते. तर विशेष मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल उपस्थित होत्या. तसेच तज्ञ मार्गदर्शक म्हणून दिल्ली येथील दीनदयाळ शोध संस्थेचे अध्यक्ष प्रा.उपेंद्र कुळकर्णी, सहकारी संस्था दुग्ध छत्रपती संभाजी नगरच्या विभागीय उपनिबंधक श्रीमती कल्पना शहा, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड ( मृदा ) आनंद गुजरातचे कार्यकारी संचालक संदीप भारती, संजय कौडगे, या ठिकाणी मार्गदर्शनासाठी उपस्थित होते.
या दोघांनी दोन सत्रांमध्ये सहकारी संस्था उभारणी, दुग्ध उत्पादन, वितरण विपणन, बायोगॅस उभारणी व उपयोगीता सर्व बारकाईने माहिती दिली. खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या पुढाकारात हा कार्यक्रम आज घेण्यात आला.
नांदेड जिल्ह्यामध्ये दुग्ध उत्पादन वाढविण्यामध्ये भरपूर वाव असून यासाठी सहकाराचा मंत्र पुढे घेऊन वाटचाल करणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासन या उपक्रमामध्ये आपल्या पाठीशी असून आपण याची सुरुवात करावी. जिल्ह्यातील सहकारी दूध संस्था तसेच दूध उत्पादन वाढविण्यासाठी एकत्र यावे. त्याचे प्रशिक्षण आज इथे दिले गेले.
शासन दुग्ध उत्पादनात मागे राहिलेल्या जिल्ह्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आपण स्वतः या सर्व व्यवसायाचा अनुभव घेतला असून यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला मदत करण्यासाठी तत्पर असू असे त्यांनी सांगितले. मात्र दुग्ध व्यवसाय वाढविण्यासाठीचे उद्दिष्ट मी माझ्या स्वतःला घेतल्या असून हा उपक्रम निरंतर राबविणार असल्याचे खासदारांनी सांगितले.
यावेळी उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित केले. केंद्र शासनाच्या अनेक योजना जिल्ह्यात उपलब्ध आहेत. त्याचा लाभ घ्यावा. आजच्या कार्यशाळेतून दुग्ध उत्पादनाला व सहकारी संस्था निर्मितीला गती यावी,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नांदेड जिल्ह्यातील दुग्ध उत्पादनाची सद्यस्थिती महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्याच्या तुलनेत अतिशय नाजूक आहे. दुग्ध उत्पादन क्षेत्रांमध्ये जिल्ह्याला प्रगती करायला भरपूर वाव आहे. यासाठी प्रशासन मदतीला तत्पर आहे. मात्र आपण सर्वांनी चांगल्या प्रशिक्षणातून पुढे जाऊन हे काम करावे, केवळ उद्योग व्यवसाय उभारताना शासकीय निधी मिळतो आहे, अनुदान मिळते आहे, म्हणून या व्यवसायात येऊ नका. तर प्रामाणिकपणे आपल्या उपजीविकेचे साधन या व्यवसायाला बनवायचे असेल तरच या व्यवसायात या असे आवाहनही त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनीही मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी या क्षेत्रात योग्य प्रशिक्षण घेऊन वाटचाल करावी, अशी सूचना त्यांनी केली. शेतकऱ्यांनी दूध उत्पादन करताना आपल्या शेतामध्ये चारा उत्पादित होईल, याकडे देखील लक्ष वेधावे. संपूर्ण व्यवसाया बाबत तांत्रिक सल्ला मात्र घ्यावा, असेही स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरीकसिंग वासरीकर यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी आले होते.
00000
No comments:
Post a Comment