Thursday, March 6, 2025

वृत्त क्रमांक 260

सीईओंच्या उपस्थितीत मुखेड येथे नागरिकांच्या तक्रारींचे निवारण

नांदेड, दि ६ मार्च : -जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या उपस्थितीत मुखेड पंचायत समिती येथे दिनांक 4 मार्च रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्‍यात आले होते. मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या बैठकित नागरिंकांच्‍या समस्यांवर चर्चा करुन निवारण करण्यात आले. 

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुखांची उपस्थिती होती.

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी नागरिकांच्या व्यक्तिगत तक्रारी ऐकून त्यांच्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या या प्रयत्नांचे कौतुक केले. तक्रार निवारण दिनाच्या आयोजनामुळे नागरिकांना त्यांच्या समस्यांबाबत त्वरित उत्तर मिळाली. तक्रार निवारण उपक्रमामुळे प्रशासन व नागरिकांमध्ये सुसंवादाची भावना निर्माण झाली. तसेच समस्यांचे त्वरित निराकरण करण्यात आले. यावेळी नागरिकांनी दिलेले निवेदन जिल्‍हा स्‍तरावर संबंधीत विभाग प्रमुखांना वर्ग करण्‍यात आले असून त्‍या तक्रारीचे निवारण करण्‍यात येणार आहे.

तक्रारींचा आढावा घेण्यासाठी सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्‍कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, जलजिवन मिशचे प्रकल्‍प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी नारायण मिसाळ, जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीण घुले, समाजकल्‍याण अधिकारी सत्‍येंद्र आऊलवार, शिक्षणाधिकारी डाॅ. सविता बिरगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी थोरात, कार्यकारी अभियंता भोजराज, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार तसेच विविध विभागाचे खाते प्रमुख, गट विकास अधिकारी सी.एल. रामोड आदींची उपस्थिती होती.

चौकट 

शाळेस भेट ; विद्यार्थ्यांना शिकवले गणित

मुखेड दौऱ्यादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव व नायगाव तालुक्यातील मांजरम येथे आकस्मिक भेट देऊन तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्य सुविधांची पाहणी केली.

पिंपळगाव महादेव येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देताना त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांचे शैक्षणिक प्रश्न समजून घेतले. विशेष म्हणजे, त्यांनी स्वतः शिक्षकाची भूमिका स्वीकारत नववीतील विद्यार्थ्यांचा गणिताचा वर्ग घेतला.     

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी मेहनत, चिकाटी  व सातत्याच्या महत्त्वावर भर दिला तसेच उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरित केले.

00000

No comments:

Post a Comment