वृत्त क्रमांक 200
नांदेड येथे राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धाची जय्यत तयारी
मैदानी खेळासाठी मैदाने तयार करण्याचे काम प्रगतीपथावर
नांदेड जिल्ह्यासाठी योगदान देणाऱ्या तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांचा होणार गौरव
नांदेड, दि. 19 फेब्रुवारी :- नांदेड येथे 21,22 व 23 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा होत आहेत. त्या अनुषंगाने नांदेड येथे छत्रपती संभाजी नगर, कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, नोंदणी व मुद्रांक विभाग, भूमि अभिलेख विभाग या विभागातील जवळपास अडीच ते ३ हजार अधिकारी व कर्मचारी खेळाडू नांदेड येथे उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील सर्व, विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
राज्यस्तरीय महसूली क्रीडा स्पर्धेत व्हॉलीबॉल, लॉन टेनिस, फुटबॉल, बॅडमिटन, कॅरम, टेबल टेनिस, बुध्दीबळ, कबडी, खो-खो, किक्रेट इत्यादी खेळाच्या स्पर्धा होणार आहेत. यात मैदानी खेळ पिपल्स कॉलेज, सायन्स कॉलेज, श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम, जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहेत. मैदानी खेळासाठी मैदाने सुरळीत करण्याचे काम प्रगतीपथावर सुरु असून संबंधित अधिकारी कर्मचारी त्यासंबंधी पाहणी करीत आहेत. तसेच जी मैदान खेळासाठी तयार आहेत अशा मैदानावर खेळांचे सराव सुरु आहेत.
नांदेड शहरातील श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम येथील मैदानावर क्रिकेट तर स्टेडियमच्या बाजूला असलेले इंदिरा गांधी मैदानावर कबडी, खो-खो आणि जिल्हा क्रीडा संकुलाच्या हॉलमध्ये महिला व पुरुषांचे बॅडमिंटन, कॅरम, टेबलटेनिस, बुध्दीबळ इत्यादी खेळ होणार आहेत. पिपल्स कॉलेजच्या मैदानावर फुटबॉल तर सायन्स कॉलेजच्या मैदानावर व्हॉलीबॉल, लॉन टेनिस, महिलांचे रिंग टेनिस हे खेळ होणार आहेत. हे खेळ सकाळ, दुपार, सत्रात होणार आहेत. नांदेड येथे इतर जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी यांचे आगमन सुरु असून त्यांच्या खानपानाची व निवासाची सोय जिल्हा प्रशासनाकडून करण्यासाठी विविध समित्यांची नियुक्त करण्यात आली आहे.
तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांचा होणार गौरव
नांदेड येथे पहिल्यांदाच राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नांदेड जिल्ह्यासाठी योगदान देणाऱ्या यापूर्वीच्या जिल्हाधिकांऱ्यांचा अविरत महसूल सन्मानाने गौरव करण्यात येणार आहे. यात डॉ. श्रीकर परदेशी, तानाजी सत्रे, सुरेश काकाणी, राधेश्याम मोपलवार, धीरज कुमार, अरुण डोंगरे, डॉ. विपीन इटनकर, अभिजीत राऊत यांचा अविरत महसूल विशेष योगदान पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व विभागाचे विभागीय आयुक्त या तीन दिवशीय स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत.
000000
No comments:
Post a Comment