Monday, November 4, 2024

महत्त्वाचे विशेष वृत्त 1023

उमेदवार ठरले : आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा - जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत

* लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अंतिम 19 उमेदवार  

* नऊ विधानसभेसाठी 165 उमेदवार रिंगणात 

* लोकसभेसाठी 19 लाख 8 हजार 546 मतदार

* विधानसभेसाठी 27 लाख 87 हजार 947 मतदार 

* जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी तयार 

नांदेड दि. 4 नोव्हेंबर :- महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या महत्त्वपूर्ण टप्प्याची सुरूवात आज पासून झाली आहे. नऊ विधानसभेसाठी 165 उमेदवार मैदानात आहेत. तर नांदेड जिल्ह्यात याचवेळी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत. 14 दिवस प्रचारासाठी मिळणार असून 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पुढच्या रणधुमाळीत उमेदवारांपासून ते सामान्य मतदारांपर्यंत सर्वांनीच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच भयमुक्त व पारदर्शी वातावरणात मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. 

20 नोव्हेंबरला मतदान 

निवडणूक प्रक्रियेतील आपल्या दुसऱ्या पत्रकार परिषदेत मोठ्यासंख्येने तरुणांनी मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच येणाऱ्या 20 नोव्हेंबरला आपल्या भविष्याचा निर्णय घेतांना कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील 6 मतदारसंघामध्ये एकाचवेळी लोकसभा व विधानसभेसाठी मतदान करावे लागणार आहे. अवघ्या काही सेकंदामध्ये ही प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व लागणाऱ्या मतदान यंत्रणांची उपलब्धता विपूल प्रमाणात असल्याची माहिती त्यांनी दिली. सोबतच दिवस छोटा असल्यामुळे सर्व मतदान केंद्रावर सायंकाळीच दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

एकूण मतदार 

यावेळी त्यांनी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 19 लाख 8 हजार 546 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यामध्ये 9 लाख 78 हजार 234 पुरूष तर 9 लाख 30 हजार 158 महिला व 154 तृतीयपंथीय मतदार असल्याची आज पर्यंतची यादी जाहीर केली. ज्या सहा विधानसभा क्षेत्रात ही निवडणूक होणार आहे त्याची मतदार संख्याही जाहीर करण्यात आली. लोकसभेमध्ये भोकर विधानसभा क्षेत्रात 3 लाख 3 हजार 103, नांदेड उत्तर 3 लाख 58 हजार 918, नांदेड दक्षिणमध्ये 3 लाख 16 हजार 821, नायगावमध्ये 3 लाख 10 हजार 375, देगलूरमध्ये 3 लाख 12 हजार 237, मुखेडमध्ये 3 लाख 7 हजार 92 एवढे मतदार आहेत. त्यामुळे एकूण 19 लाख 8 हजार 546 मतदार मतदान करणार आहेत.   

तर विधानसभेसाठी आणखी तीन तालुके यामध्ये वाढले असून किनवटमध्ये 2 लाख 78 हजार 65, हदगावमध्ये 2 लाख 99 हजार 86, लोहामध्ये 3 लाख 1 हजार 650 मतदार मतदान करणार आहेत. एकूण 9 विधानसभा क्षेत्रामध्ये 27 लाख 87 हजार 947 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी येत्या 20 नोव्हेंबरला मतदानासाठी बाहेर पडावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

रिंगणातील उमेदवार 

आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत वैध 39 उमेदवारांपैकी 20 उमेदवारांनी अर्ज परत घेतला. त्यामुळे 19 उमेदवार रिंगणात आहेत. 

किनवट विधानसभेसाठी 29 उमेदवारांपैकी 12 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे 17 जण रिंगणात आहेत.  

हदगाव विधानसभेसाठी वैध असणाऱ्या 63 उमेदवारांपैकी 39 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे 24 उमेदवार रिंगणात आहेत.

भोकर विधानसभेमध्ये 140 वैध उमेदवारांपैकी 115 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे 25 उमेदवार रिंगणात आहेत. 

नांदेड उत्तरमध्ये 72 वैध उमेदवारांपैकी 39 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे 33 उमेदवार रिंगणात आहेत. 

नांदेड दक्षिणमध्ये एकुण 51 वैध उमेदवारांपैकी 31 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 20 उमेदवार रिंगणात आहेत.

लोहा विधानसभा क्षेत्रात वैध 33 उमेदवारांपैकी 19 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 14 उमेदवार रिंगणात आहेत. 

नायगाव विधानसभा क्षेत्रात 26 वैध उमेदवारांपैकी 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 10 उमेदवार रिंगणात आहेत. 

देगलूर विधानसभा निवडणुकीत 27 वैध उमेदवारांपैकी 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे 11 उमेदवार रिंगणात आहेत.

मुखेड विधानसभेमध्ये 17 वैध उमेदवारांपैकी 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे 11 उमेदवार रिंगणात आहेत.

जिल्ह्यामध्ये 9 विधानसभेसाठी एकूण 458 उमेदवारांपैकी 293 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे एकूण 165 उमेदवार रिंगणात आहेत.  

पाच केंद्रे संवेदनशील

जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्या 3 हजार 88 असून मतदान केंद्रांची ठिकाणे 1 हजार 992 आहेत. यामध्ये शहरी 396 तर ग्रामीण 1 हजार 596 मतदान केंद्र आहेत. अनेक जागेवर एका ठिकाणी अनेक मतदान केंद्र आहेत. शंभर टक्के मतदान अधिकारी महिला असलेले मतदान केंद्र 9 आहेत तर शंभर टक्के अधिकारी दिव्यांग असलेले मतदान केंद्र 9 आहेत. शंभर टक्के मतदान अधिकारी युवा असलेले मतदान केंद्र 9 आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या 5 असून यामध्ये पांगरपहाड (किनवट), चोरंबा (हदगाव), पाकीतांडा (भोकर), रामतीर्थ (देगलूर), कोलेगाव (मुखेड) यांचा समावेश आहे. याठिकाणच्या सर्व मतदान प्रक्रियेवर विशेष लक्ष असणार आहे. 

00000 







No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...