Saturday, October 19, 2024

 वृत्त क्र. 961

निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखा- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नागरिकांनी सी-व्हीजल ॲपवर तक्रारी नोंदविण्याचे आवाहन
नांदेड दि. 19 ऑक्टोबर :- नांदेड जिल्ह्यात 9 विधानसभा व लोकसभा पोटनिवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यात 15 ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता सुरु झाली आहे. या काळात पैशाची देवाण-घेवाण, भेट वस्तु वाटप, रोख रक्कम, अंमली पदार्थ, दारु विक्री व वाहतूक अशा घटनावर नियंत्रण होण्यासाठी संबंधित यंत्रणानी काळजी घ्यावी. यादृष्टीने जिल्ह्यात एफएसटी व एसएसटी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांनी जास्तीत जास्त कारवाई करुन जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.
कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवन येथे आज त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवडणूक सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सर्व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी आदीची उपस्थिती होती.
जिल्ह्यात विधानसभा व लोकसभा पोटनिवडणूकीची आदर्श आचारसंहिता सुरु झाली असून या कालावधीत आचारसंहितेचा भंग होणार नाही यांची काळजी सर्व विभागानी घ्यावी. निवडणूका मुक्त, निर्भय वातावरणात व प्रलोभन मुक्त होण्यासाठी सर्व सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. सर्व परिस्थितीवर एसएसटी व एफएसटी पथके बारीक लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यात वाहतूक होणाऱ्या सर्व वाहनाची इएसएमएसला नोंद होईल यादृष्टीने कारवाई व्हावी. जीएसटी. आयकर. पोलीस विभागांनी पेट्रोलिंग वाढवावे. तसेच सिझरचे प्रमाण वाढवावे अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. तसेच नागरिकांनी कुठेही आचारसंहिता भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास सि-व्हीजल ॲपवर पुराव्यासह तक्रारी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच यापुढे सि-व्हीजल ॲपवर तक्रारी आल्यास संबंधीत विभागाने गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करावी असेही त्यांनी स्पष्ट केले.
नांदेड जिल्ह्यात 1 हजार 158 शस्त्र परवाने दिलेले आहेत. शस्त्र जमा करण्याची कारवाई प्रगती पथावर असून मागील लोकसभा निवडणूकीत 782 शस्त्र जमा करण्यात आली होती. नांदेड जिल्ह्यात 9 विधानसभा मतदार संघात ग्रामीण भागासाठी 2 हजार 265 व शहरी भागासाठी 823 असे एकूण 3 हजार 88 मतदान केंद्र असून मतदान केंद्रावर गोंधळ होवू नये यासाठी तेथील नियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. जिल्ह्यात पाच सवेदनशिल मतदान केंद्र असून या ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रीया होईल यासाठी सर्वांनी सतर्क रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
निवडणूक काळात सतर्क राहा: जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार
विधानसभा व लोकसभा पोटनिवडणूक दोन्हीही निवडणूका एकत्र होत आहेत. या निवडणूक कालावधीत आपल्यावर जास्त जबाबदारी असून, उपलब्ध मनुष्य बळामध्ये ही मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडावयाची आहे. नांदेड जिल्हा इतर राज्याच्या सीमेला लागून असल्यामुळे एकमेकात समन्वय साधत निवडणूक कालावधीत रोख रक्कम, अंमली पदार्थ, शस्त्रास्त्र, मद्य यांची वाहतूक व विक्री होणार नाही यांची काळजी घ्यावी. नियुक्त केलेल्या विशेष पथकांनी जास्तीत जास्त दक्ष राहून कारवाया कराव्यात, असे निर्देश जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी दिले.
स्वीप मार्फत मतदार जनजागृतीवर भर: मीनल करनवाल
नांदेड जिल्ह्यात 9 विधानसभा व लोकसभा पोटनिवडणूकीसाठी मतदान 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत आहे. या निवडणूकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी स्वीपमार्फत जनजागृती कार्यक्रम सुरु केले आहेत. यावेळी मतदानाचे जास्तीत जास्त उदिष्ट गाठण्यासाठी स्वीप मार्फत जनजागृती कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगितले.
0000














No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...